“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशीही केली चर्चा

“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. भारताची पदकाची संधी हुकली आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने ५० किलो फ्री स्टाइल गटात जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे भारताचे एक पदक निश्चित झाले होते. मात्र, विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. यानंतर विनेश फोगटसह देशाला याचा धक्का बसलेला असतानाचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश फोगट हिचे मनोबल वाढवत सांत्वन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “विनेश तू चॅम्पियन आहेस. तू देशाचा अभिमान आणि प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी आहेस. आजचा सेटबॅक हा दुःखद आहे. माझे शब्द माझ्या मनातील निराशा दाखवू शकणार नाहीत. पण, तू लढवयी आहेस, हार न मानणारी आहेस. आव्हानांचा स्वीकार करण्याचा तुझा स्वभाव आहे. तू पुन्हा अधिक ताकदीने पुढे ये. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या अपात्रतेनंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा..

बांगलादेशात संतप्त जमावाने प्रसिद्ध अभिनेत्यासह वडिलांची मारहाण करत केली हत्या !

बांगलादेशात आंदोलकांकडून अवामी लीग पार्टीच्या २० नेत्यांची हत्या

डॉ. दातार यांना यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

ट्रम्प यांच्या हत्येच्या कटामागे इराणशी संबंधित पाकिस्तानी व्यक्ती?

विनेश फोगाट ही स्पर्धेत ५० किलो फ्री स्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र, तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याने अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता सुवर्ण आणि रौप्य पदकाची संधी हुकलेली विनेश फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

Exit mobile version