भारत सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आपल्याला कोणतीही मदत पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान केली नाही, असा आरोप कुस्तीगीर आणि सध्या काँग्रेसकडून हरयाणात निवडणूक लढविणारी विनेश फोगाट हिने केल्यानंतर त्यावर आता स्पष्टीकरण आले आहे. या सगळ्या प्रकरणात विनेश फोगाटच्या बाजूने न्यायालयीन लढाई लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी यातले वास्तव समोर आणले आहे.
विनेशने एका मुलाखतीत म्हटले होते की, पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान जेव्हा समस्या निर्माण झाली होती तेव्हा कुणीही आमची मदत केली नाही. पीटी उषा भेटायला आल्या होत्या पण त्या फक्त फोटो काढण्यापुरत्याच होत्या.
हे ही वाचा:
हिमाचलमध्ये आणखी एक अनधिकृत मशीद; हिंदू संघटनांचा आरोप !
पोर्ट ब्लेअरचे नाव आता ‘श्री विजयपुरम’
मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !
माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन
त्यावर हरिश साळवे यांच्याशी टाइम्स नाऊने चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की, याबाबत आपल्याला पीटी उषा सगळी माहिती देऊ शकतील. आम्ही न्यायालयीन लढाई लढलो. आम्ही असेही म्हटले होते की, आपण हे प्रकरण स्वीस न्यायालयात नेऊ. पण विनेश त्यासाठी राजी नसल्याचे आम्हाला कळविण्यात आले. सरकारचा यात काही संबंध आहे, असे म्हटले जात असेल तर सरकारचा असा कोणताही संबंध नसतो. कारण ऑलिम्पिकच्या कोणत्याही बाबतीत सरकारचा हस्तक्षेप असेल तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना कारवाई करू शकते.
विनेश फोगाटचे वजन जादा भरल्यानंतर तिला अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचूनही तिला बाद व्हावे लागले आणि पदकापासून ती वंचित राहिली. तिने पदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागितली पण तिचे अपील फेटाळण्यात आले. याच प्रकरणात ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा या तिला भेटल्याही होत्या.