पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये वजनामुळे कुस्ती खेळात बाद झालेल्या विनेश फोगटवर भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तने टीका केली आहे. कोणत्याही खेळात नियम असतात आणि नियमांमध्ये बसत नसल्यास खेळाडूला साहजिकच बाद ठरवले जाते, विनेश देखील तशीच बाद झाली. मात्र, विनेशने अपात्रतेसाठी स्वतः ऐवजी इतरांना जबाबदार धरले. जर त्या ठिकाणी मी असतो तर माफी मागितली असती, असे कुस्तीपटू दत्तने म्हटले आहे. आज तकच्या टीव्ही न्यूजचॅनलवर ‘पंचायत’ या कार्यक्रमात कुस्तीपटू योगेश्वर दत्त बोलत होते.
योगेश्वर दत्त म्हणाले, जेव्हा विनेशने तिच्या ऑलिम्पिक अपात्रतेबद्दल कटाचा संशय पसरवण्यास सुरुवात केली तेव्हा मला आश्चर्य वाटले. विनेशने या घटनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले. ते पुढे म्हणाले, स्पर्धेतून बाद करण्यात आल्यानंतर तिने तिच्याकडून झालेल्या चुका सांगून माफी मागायला हवी होती, पण त्याऐवजी, तिने याला षड्यंत्र ठरवले, अगदी देशाच्या पंतप्रधानांवरही दोषारोप केले. सर्वांनाच माहिती आहे की, विनेश अपात्र होती, कारण वजन एका ग्रॅमने जास्त वाढले तरी खेळाडूला बाद ठरवले जाते, असे योगेशवर दत्त म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यासह भारतीय कुस्ती महासंघाच्या माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या निदर्शनावरही योगेश्वर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, देशात विनेशने चुकीचे वातावरण तयार केले. निदर्शनांच्या वेळीही लोकांना चुकीच्या मार्गाने एकत्र येण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
‘धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, भारतात याची गरज नाही’
७५ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा छत्तीसगडमध्ये खात्मा
महिला टी- २० विश्वचषकासाठी पहिल्यांदाच महिला सामनाधिकारी, पंच
वक्फ बोर्डाने काबीज केलेली ५९ एकर जमीन जप्त!
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून बाद झाल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होऊन राजकारणात प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून विनेशला हरियाणामधून उमेदवारी देण्यात आली आहे.