महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!

विनेश फोगाटने काँग्रेस प्रवेश केल्यानंतरची प्रतिक्रिया

महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!

नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या मात्र पदकापासून वंचित राहिलेल्या कुस्तीगीर विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिचे काका महावीर फोगाट यांनी तिला काँग्रेसऐवजी भाजपात जाणे योग्य ठरले असते असा सल्ला दिला आहे.

महावीर फोगाट यांच्याच मार्गदर्शनाखाली विनेशने कुस्तीचे धडे गिरविले. महावीर यांनी बबिता फोगाट, गीता फोगाट यांना कुस्ती खेळण्यास प्रवृत्त केले आणि एकप्रकारे महिलांना कुस्ती खेळण्यासाठी जो विरोध होता तो मोडून त्यांनी क्रांतिकारक पाऊल उचलले होते.

विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिला जुलाना या ठिकाणाहून निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. विनेशसोबत बजरंग पुनियानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे.

विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ट्रिब्युन या दैनिकाशी बोलताना महावीर म्हणाले की, तिने कुस्तीतच आपली कारकीर्द करत राहावी असे आपण सुचविले होते. मी तिला म्हटले होते की, पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या दृष्टीने तू तयारी कर. पण तिने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा तिचा स्वतःचा निर्णय आहे.

महावीर म्हणाले की, तिच्यात अजूनही कुस्तीतील मोठी कारकीर्द शिल्लक होती. या क्षणी तिने कुस्ती सोडायला नको होती. तिने यासंदर्भात आपल्याशी कोणतीही चर्चादेखील केलेली नाही.

महावीर फोगाट म्हणाले की, जर ती निवडणुकीत उभी राहिली तर ते मी तिच्यासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरणार नाही किंवा मी तिच्या प्रचारासाठीही प्रयत्न करणार नाही. काँग्रेसबाबतही महावीर यांनी नकारात्मक भूमिका व्यक्त केली. ते म्हणतात की, विनेशने काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी भाजपात प्रवेश करायला हवा होता.

महावीर यांची कन्या बबिताने दादरीमधून विधानसभा निवडणूक लढविली होती पण तिला त्यात पराभव पत्करावा लागला.

 

 

Exit mobile version