पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारणारी मात्र १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र ठरवण्यात आलेल्या विनेश फोगाटचे पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. आपत्रतेच्या निर्णयाविरोधात तिने क्रीडा लवादाकडे अपील केले होते पण ते अपील फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे तिला आता संयुक्तरित्या किंवा कोणत्याही पद्धतीने पदक मिळणार नाही. तिला रौप्य पदक मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण तिची ती इच्छा पूर्ण झाली नाही.
कोर्ट ऑफ आरबीट्रेशनने तिचे अपील फेटाळले. १४ ऑगस्टला लवादाने हा निर्णय दिला आणि तो जाहीर केला. त्याआधी तीनवेळा हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. १६ ऑगस्टला निर्णय दिला जाईल असे कळले होते पण कोर्टाने १४ तारखेलाच निर्णय दिला. या निर्णयामुळे विनेश पदकापासून वंचित राहिलीच शिवाय, ती त्या वजनी गटात अखेरच्या क्रमांकावर फेकली गेली.
भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी या निर्णयामुळे निराश झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या कायदे तज्ज्ञांनी या संदर्भात पूर्ण प्रयत्न केले. विनेश प्रकरणात जे नियम लावण्यात आले ते खूप कठोर आणि अमानवीय होते. असे नियम खेळाडूंवर येणाऱ्या मानसिक ताणतणावांचा विचार करत नाहीत. विशेषतः महिलांबाबत हा विचार व्हायला हवा. यापुढे या नियमात खेळाडूंच्या हिताचा विचार करून काही सुधारणा केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
भारतातील १३ गावांमध्ये पहिल्यांदा फडकणार ‘तिरंगा’
पवारांनी वाटोळे केले, असे म्हणताय ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…
आशा पारेख यांना स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार
बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराबद्द्ल रिपब्लिकन नेत्याने केला निषेध
लवादाच्या न्यायाधीश डॉ. ऍनाबेल बेनेट यांनी विनेश, जागतिक कुस्ती संघटना, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना याना अधिकाधिक पुरावे सादर करण्याची पूर्ण संधी दिली.
ऍनाबेल यांनी ९ ऑगस्टला प्रथम विनेशची बाजू ऐकली. त्यावेळी विनेशच्या फ्रान्सच्या वकिलांनी सोबत केली पण नंतर हरीश साळवे, विदुष्पत सिंघानिया यांनी विनेशच्या वतीने युक्तिवाद केला.
अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी झालेल्या वजन मोजणीत तिचे वजन १०० ग्रॅम अधिक भरले. त्यामुळे ती अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली. त्याआधी रात्री तिने आपले वजन ५० किलो मध्ये राहावे यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले.
तिला अंतिम फेरी गमवावी लागल्याने देशभरात खळबळ उडाली. निदान तिला रौप्य द्यावे अशी अपेक्षा लोक करू लागले. पण क्रीडा लवादात भावनेला स्थान नसते हे स्पष्ट झाले.