भारताची आघाडीची कुस्तीगीर विनेश फोगाटने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुडघेदुखीमुळे आपण या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे तिने कळविले आहे. तिने घेतलेल्या माघारीमुळे तिच्यासह राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आलेल्या अंतिम पंघलला आता संधी मिळेल.
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसलेले विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे खेळाडू गेल्या काही महिन्यात चर्चेत आले होते. त्यातून बरेच राजकारण झाले. त्या आंदोलनामुळे त्यांना सरावाची संधी मिळाली नाही. तरीही त्यांना कोणतीही चाचणी न देता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आले. त्यातून वाद निर्माण झाला होता. अंतिम पंघलसारख्या युवा खेळाडूने याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
२३ सप्टेंबरपासून हांगझू येथे ही स्पर्धा होत आहे. त्यातील कुस्ती क्रीडा प्रकारासाठी नुकतीच निवड करण्यात आली. त्यासाठी विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या खेळाडूंचे वजनी गट वगळता इतर गटांसाठी चाचणी घेण्यात आली होती.
विनेशने एक्सवर आपल्या दुखापतीसंदर्भातील पत्र टाकत आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकत नसल्याचे कळविले आहे.
तिने म्हटले आहे की, मला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, १३ ऑगस्ट २०२३ला सरावादरम्यान माझ्या डाव्या गुडघ्याला इजा झाली. स्कॅन आणि चाचण्या झाल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करणे हाच उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे ही वाचा:
केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!
अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !
हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू!
त्यानुसार आता १७ ऑगस्टला मी मुंबईत शस्त्रक्रिया करणार आहे. २०१८च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत मी सुवर्ण जिंकले होते. ते पुन्हा मिळविण्याची संधी मला होती पण दुर्दैवाने या दुखापतीमुळे मला ती संधी सोडावी लागत आहे.
अंतिम पंघल आणि सुजीत कालकल यांनी विनेश आणि बजरंग यांना थेट प्रवेश दिल्यामुळे न्यायालयात धाव घेतली होती.
पंघलने ५३ किलो वजनी गटात चाचणी जिंकली तर विशाल कालिरामन ६५ किलो वजनी गटात विजेता ठरला. त्यामुळे या दोघांचीही राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
विनेश आणि बजरंगला थेट आशिय़ाई क्रीडा स्पर्धेत प्रवेश दिल्यानंतर कुस्ती वर्तुळात टीका झाली होती.
विनेशने म्हटले आहे की, आपण यासंदर्भात संबंधितांना कळविले आहे आणि राखीव खेळाडूंना संधी द्यावी असे म्हटले आहे. १९ वर्षीय पंघल २० वर्षांखालील मुलींच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळत आहे. पण आता ती ५३ किलो वजनी गटात आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहे.