आंदोलनात उतरलेल्या बजरंग, विनेशची थेट निवड

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचणीतून दिली सूट

आंदोलनात उतरलेल्या बजरंग, विनेशची थेट निवड

भारतीय ऑलिम्पिक समितीच्या हंगामी प्रशासन समितीने मंगळवारी ऑलिम्पिक पदकविजेता बजरंग पुनिया (६५ किलो) आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेती विनेश फोगाट (५३ किलो) यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट निवड केली आहे. या दोघांचीही कोणतीही चाचणी आता होणार नाही. राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मंजुरीशिवाय हा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून इतर कुस्तीगीरही त्यामुळे नाराज आहेत.

आयओसीच्या समितीने हा निर्णय जाहीर करताना म्हटले आहे की, ६५ किलो आणि ५३ किलो वजनी गटातील निवड झालेली आहे मात्र इतर वजनी गटांसाठी चाचणी घेतली जाईल. या पत्रकात समितीने विनेश फोगाट, बजरंग यांची नावे घेतली नसली तरी या समितीचे सदस्य अशोक गर्ग यांनी या दोघांची निवड झालेली आहे असे स्पष्ट केले आहे. या दोघांना चाचणीतून सूट देण्यात आली आहे, असे गर्ग यांनी म्हटले आहे.

या दोन्ही कुस्तीगीरांनी ६५ किलो आणि ५३ किलो या दोन्ही वजनी गटातून खेळताना चांगली कामगिरी केलेली आहे. बृजभूषण शरण यांच्याविरोधात आंदोलनात हे दोन्ही खेळाडू उतरले होते त्यामुळे त्यांना सराव करता आला नाही. त्यामुळे चाचणीचा मुद्दा उपस्थित झाला होता. याच वजनी गटात सुजीत कालाकल आणि अंतिम पंघल यांनी दमदार कामगिरी केलेली आहे, पण त्यांना संधी मिळालेली नाही.

गेल्या वर्षी अंतिम पंघलने २० वर्षांखालील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. तर वरिष्ठ गट आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिने रौप्य जिंकले होते. सुजीतने २३ वर्षांखालील गटात आणि २० वर्षांखालील गटात आशियाई विजेतेपद पटकाविलेले आहे. २० वर्षांखालील गटात त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझ जिंकलेले आहे. या समितीने साक्षी मलिक, तिचा पती सत्यव्रत कादियान, जितेंद्र किन्हा आणि बजरंगची पत्नी संगीता फोगाट यांना मात्र चाचणीतून सूट दिलेली नाही.

२३ सप्टेंबरपासून चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीपूर्वी चार दिवस आधी या समितीने सदर निर्णय घेतला. या स्पर्धेत ग्रीको रोमनमध्ये ६०, ६७, ७७, ८७, ९७, १३० किलो अशा विविध वजनी गटात स्पर्धा होणार आहेत तर महिलांमध्ये ५०, ५३, ५७, ६२, ६८, ७६ किलो अशा गटात स्पर्धा होतील. पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये ५७, ६५, ७४, ८६, ९७, १२५ किलो अशा गटात लढती होतील. यासाठी चाचणी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये २३ जुलैला होत आहे.

कुस्तीगीर महासंघाने चाचणीतून सूट देण्यासंदर्भात जी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत त्यानुसार सर्व वजनी गटासाठी चाचणी ही अनिवार्य आहे. तरीही अपवादात्मक परिस्थितीत ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी वेगळा विचार करता येईल अर्थात त्यासाठी मुख्य प्रशिक्षकाची, परदेशी प्रशिक्षकाची मंजुरी घ्यावी लागेल. बजरंग आणि विनेश यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकलेली आहेत पण त्यांची थेट निवड करताना मुख्य प्रशिक्षक जगमंदर सिंग, व महिला प्रशिक्षक वीरेंद्र दहिया यांना अंधारात का ठेवण्यात आले हा प्रश्न आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून आता बाहेर

किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

पावसामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली; चाकरमान्यांचे हाल

नितीश कुमार यांचा आघाडीच्या ‘इंडिया’ नावावर आक्षेप

जगमंदर सिंग म्हणाले आहेत की, असा निर्णय घेण्यात आला याची मला काहीही माहिती नाही. हंगामी समितीने आम्हाला बैठकांना बोलावणे बंद केले आहे. आम्ही या दोन खेळाडूंबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही. सर्व वजनी गटात चाचणी व्हायला हवी या मताचे आम्ही आहो. वीरेंद्र दहिया म्हणाले की, आम्हाला ठाऊक नाही की विनेश फोगाट, बजरंग हे नेमके कोणत्या स्थितीत आहेत. त्यांचा खेळण्यातला वेग, ताकद, वजन याबाबत आम्हाला माहीत नाही. गेल्या वर्षी राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धेत खेळल्यानंतर ते खेळलेले नाहीत. शिवाय, ५३ आणि ६५ किलो वजनी गटात जे नवे चेहरे आहेत त्यांच्याकडे उत्तम क्षमता आहे. हंगामी समितीने हा निर्णय घेताना आम्हाला दुर्लक्षित केले.

Exit mobile version