मणिपूरमधील एका शिक्षकाने पेन टाकून बंदूक उचलली आहे. नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यानेही हातात बंदूक धरली आहे. त्याचा बराचसा वेळ बंकरमध्येच जातो. मणिपूरमधील आयुष्य आता असे बदलले आहे. पदोपदी अविश्वास आणि हिंसाचार वाढत असताना मणिपूरमधील सामान्य नागरिकच गावांचे रक्षण करत आहेत.
मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायातील अनेक जण गावाच्या संरक्षणासाठी आता बंकरमध्ये राहात आहेत. रायफल, इंटरकॉम आणि दुर्बिणीने सज्ज राहाणे, हेच त्यांचे आयुष्य झाले आहे. या माणसांना नियमित नोकऱ्या होत्या आणि मे महिन्यात राज्यात जातीय हिंसाचार सुरू होण्याआधी त्यांच्यापैकी काहीजण शाळा आणि महाविद्यालयातही जात होते. मात्र राज्य सरकारवरील अविश्वास वाढल्याने आता त्यांच्या गावांमधील घरांचे आणि कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी स्वतःचे सशस्त्र स्वयंसेवक गट उभारले आहेत.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू होऊन ४५ दिवस उलटले आहेत. २ मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारात १००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे दोन हजार घरे आणि दुकाने जाळली गेली असून ५० हजार जण विस्थापित झाले आहेत. लष्कर, आसाम रायफल्स, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि मणिपूर पोलिसांच्या अनेक कंपन्या तैनात असूनही हिंसाचार सुरूच आहे.
बॉबी सिंग (४८) हे माजी सैनिक आहेत. मे महिन्यात हिंसाचार सुरू झाला, तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाला मणिपूरमधून दूर पाठवले. परंतु ते आपल्या गावाचे रक्षण करण्यासाठी आणि तरुण मुलांना व पुरुषांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मागे राहिले आहेत. ते सर्वाधिक दंगलग्रस्त झालेल्या जिल्ह्यांपैकी एक असणाऱ्या कांगपोकपी जिल्ह्यात राहतात. ‘आम्हाला आमचे जीवन आणि कुटुंबाचे रक्षण करावे लागेल. आम्ही दहशतवाद्यांपासून स्वतःचा बचाव करत आहोत. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील पुरुष गावांचे रक्षण करत आहेत. वृद्ध मंडळी परिसरात गस्त घालत आहेत. महिला मुलांची काळजी घेत आहेत आणि स्वयंसेवकांसाठी स्वयंपाक करत आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
मैतेई समुदायातील सिंग यांनी जातीय संघर्ष सुरू होण्यापूर्वी शेतकरी म्हणून काम केले. आता ते बंदुका कशा वापरायच्या, याचे प्रशिक्षण पुरुषांना देत आहेत. त्याच्या शिष्यांपैकी एक आहे, २१ वर्षीय बिमेकसन. जो इंफाळच्या कॉलेजमध्ये इतिहासाचा पदवीधर विद्यार्थी आहे. तो म्हणतो,‘माझे आयुष्य पुन्हा कधीही पूर्वीसारखे होणार नाही. माझे प्राधान्य आता करीअरला राहिलेले नाही तर, आपल्या गावाचे रक्षण करणे हे आहे.’ पुरुष बंकरमध्ये राहत असताना, स्त्रिया कम्युनिटी हॉलमध्ये राहतात, स्वयंसेवकांना वेळेवर जेवण देण्यासाठी स्वयंपाक करतात आणि एकत्र राहून मुलांची काळजी घेतात. कुकी गावातही सशस्त्र स्वयंसेवकांसाठी असेच बंकर तयार झाले आहेत. कांगपोकपी भागातील एका खासगी शाळेतील शिक्षक हाओपू गिते यांच्याकडे आता पेन आणि वह्यांऐवजी बंदुका आणि दारूगोळा आहे.
हे ही वाचा:
योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!
मेकअप आर्टिस्टचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला, हत्येचा संशय
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विधान भवनात योग दिवस केला साजरा
लष्कर ए तोयबाच्या साजीद मीरला काळ्या यादीत टाकण्यासाठी कुरापती चीनचा नकार
“मला कधी कधी रडावेसे वाटते. हिंसाचारानंतर माझी काहीही कमाई नाही. मी माझ्या मुलीला बंगळुरूला पाठवले जेणेकरून ती कुटुंबासाठी काही पैसे कमवू शकेल. तिने मला ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या. परंतु इतका वेळ अशी निर्बुद्ध हिंसा सुरू राहिल्याने आम्ही आमच्या सुरक्षिततेची खात्री बाळगू शकत नाही,’ असे गुईटे म्हणाले. चोचोन या पदव्युत्तर विद्यार्थ्याला नागरी सेवा परीक्षेची तयारी करायची होती. आता तो परीक्षेचा अभ्यास करण्याऐवजी आपला बराचसा वेळ बंकरमध्ये घालवतो. अशांतता आणि संघर्षांमुळे मणिपूरमधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. इम्फाळच्या परिघातील खेड्यांमध्ये, मैतेई समुदायाचे वर्चस्व असलेल्या खेड्यांमध्ये आणि बहुतेक कुकी लोकांची लोकसंख्या असलेल्या डोंगराळ जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कलम ३५५ लागू करून केंद्राने मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला आहे.