ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरू होते उपचार

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेले अनेक दिवस उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील पाच दशकांहून विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीवर आपल्या भारदस्त आवाजाने अधिराज्य गाजवले. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टी आणि इतर क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.  त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. तर, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

विक्रम गोखले यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला. याशिवाय हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाने आपली छाप पाडली. विक्रम गोखले यांनी १९७१ साली वयाच्या २६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि कधी मागे वळून पाहिले नाही. परवाना या पहिल्याच सिनेमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. आजवर त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. अग्निहोत्रमध्ये साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

विक्रम गोखले यांना विष्णूदास भावे जीवनगौरव, हरिभाऊ साने जीवनौरव, पुलोत्सव सन्मानाने आदी पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते. अग्निपथ चित्रपटातील त्यांची इन्स्पेक्टर गायतोंडे ची भूमिका विशेष गाजली होती. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शन देखील त्यांनी केलं.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

नटसम्राट, कळत नकळत, अनुमती, दुसरी गोष्ट, अनुमती अशा अनेक मराठी सिनेमात विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जादू रसिकांना पाहायला मिळाली आहे. तसेच हम दिल दे चुके सनम, अधर्म, स्वर्ग नरक, इंसाफ, अग्निपथ अशा हिंदी सिनेमांतदेखील त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. सिंहासन, उडान, जीवनसाथी अशा वेबसीरिजमध्येदेखील त्यांनी काम केलं आहे.

Exit mobile version