रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजयपत सिंघानिया यांनी यांनी मुलगा गौतम सिंघानिया याच्याशी समेट होत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांचा मुलगा गौतम याने वडिलांना कॉफीभेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या भेटीचे छायाचित्र पोस्ट केले होते. मात्र विजयपत यांनी त्यांच्या मुलाच्या खऱ्या हेतूबद्दल आपल्याला शंका असल्याचे स्पष्ट करून कोणतीही समेट झाली असल्याचे वृत्त खोडून काढले.
विजयपत सिंघनिया यांनी ‘इंडिया टुडे’शी याबाबत चर्चा केली. विजयपत सिंघानिया हे २० मार्च रोजी विमानतळावर जात असताना त्यांना त्यांच्या मुलाच्या सहकाऱ्याचा फोन आला. ‘गौतम सिंघानिया यांचा सहकारी मला सातत्याने घरी येण्याचा आग्रह करत होता. जेव्हा मी नकार दिला, तेव्हा गौतमने स्वतः फोनवर येऊन मला कॉफी घेण्यासाठी आमंत्रित केले. त्यासाठी केवळ पाच मिनिटेच लागतील, असेही तो म्हणाला,’ असे विजयपत म्हणाले.
‘मी इच्छा नसतानाही त्याची भेट घेतली. गौतम आमचे छायाचित्र काढून आमची समेट झाल्याचा संदेश प्रसारमाध्यमात देईल, या त्याच्या अंतस्थ हेतूची मला कल्पना नव्हती. या भेटीनंतर अवघ्या काही मिनिटांतच मी खाली उतरलो आणि विमानतळावर रवाना झालो. त्यानंतर लगेचच मला माझ्या आणि गौतमची छायाचित्र असलेले मेसेज मिळू लागले आणि गौतम आणि माझ्यामध्ये समेट झाली आहे, असा दावा केल गेला. मात्र तो पूर्णपणे खोटा आहे,’ असे स्पष्टीकरण विजयपत यांनी केले.
गौतम सिंघानिया यांनी ‘एक्स’वर आपल्या वडिलांसोबतचे छायाचित्र पोस्ट केले होते. ‘आज माझे वडील घरी आले आणि त्यांनी मला शुभाशीर्वाद दिल्यामुळे मी खूप आनंदित आहे. तुम्हाला सदैव चांगले आरोग्य लाभो, पापा,’ असे त्यांनी लिहिले होते.
विजयपत सिंघानिया यांनी उद्योग समूहाची सूत्रे गौतम सिंघानिया यांच्या हाती सुपूर्द केल्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले होते. सन २०१७मध्ये विजयपत यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या मुंबईतील जे के हाऊसमध्ये त्यांना रेमंड कंपनीने ड्युप्लेक्स फ्लॅट दिला नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांना सन २०१८मध्ये रेमंडच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.
हे ही वाचा:
विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीमुळे बेंगळुरूचा मोसमातील पहिला विजय
‘मोदी मोदीचा गजर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावा’
“भारत माता की जय, जय हिंद हे नारे रचणारे मुस्लीम होते”
सीबीआयकडून विझाग बंदरावर २५ हजार किलो कोकेन मिश्रित यीस्ट जप्त
विजयपत यांना गौतम यांनी दिलेल्या या भेटीच्या आमंत्रणामागील खऱ्या हेतूबद्दल शंका आहे. ‘मला त्याचा खरा हेतू काय होता, याची कल्पना नाही. मात्र याचा उद्देश नक्कीच एकत्र कॉफी घेणे नव्हता किंवा आम्हा दोघांमधील वाद मिटवण्याचा नव्हता. हेच सत्य आहे की, गेल्या १० वर्षांत मी पहिल्यांदाच जेके हाऊसमध्ये गेलो आणि मला नाही वाटत की पुन्हा त्या घरात प्रवेश करेन,’ असे ते म्हणाले.