गाझी बाबा, पानसिंह तोमर यांना यमसदनी पाठवणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे निधन

विजय रमण यांनी केला होता पराक्रम

गाझी बाबा, पानसिंह तोमर यांना यमसदनी पाठवणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे निधन

चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर पानसिंह तोमर आणि २००१मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, जैश-ए-मोहम्मदचा कमांडर गाझी बाबा यांचा खात्मा करणाऱ्या यशस्वी मोहिमेसाठी प्रसिद्ध असलेले आयपीएस अधिकारी विजय रमण यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते.

 

रमण मध्य प्रदेश कॅडरचे १९७५च्या तुकडीचे अधिकारी होते. त्यांना कर्करोग झाल्याचे निदान फेब्रुवारीमध्ये झाले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रमण यांना १८ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमण यांनी मध्य प्रदेश पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस दलातही जबाबदारी सांभाळळी. त्यांनी सन २००३मध्ये श्रीनगर येथे सीमा सुरक्षा दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून १० तासांच्या आव्हानात्मक चकमकीचे नेतृत्व केले होते.

 

रमण यांचा जन्म केरळमध्ये झाला. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. त्यांनी कायदा आणि भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळवले होते. तीन दशकांहून अधिक काळ त्यांची कारकीर्द बहरली. चंबळचे दरोडेखोर, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आणि छत्तीसगडमधील माओवादी बंडखोरांविरुद्ध त्यांनी धाडसी कारवाया केल्या. मध्य प्रदेशमधील भिंडचे पोलिस अधीक्षक म्हणून माजी सैनिक आणि भारताच्या १९५८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्टीपलचेस धावपटू व नंतर दरोडेखोर झालेला पानसिंह तोमर याच्याविरुद्ध १४ तासांच्या मोहिमेचे नेतृत्व केले. या चकमकीत १५ दरोडेखोर मारले गेले होते.

हे ही वाचा:

हरदीपसिंग निज्जर कॅनडात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवायचा!

खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे पंजाबमधील घर जप्त होणार

मिरवैझची सुटका करून पाकिस्तानला इशारा

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस; शाळांना सुट्टी

 

या चकमकीमुळे चंबळच्या कुख्यात डाकूंनी आत्मसमर्पण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. माजी पंतप्रधान राजीव गांधी भोपाळच्या भेटीदरम्यान रमण यांच्या कार्याने इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी त्यांना विशेष संरक्षण गटाचे प्रमुख म्हणून निवडले होते. त्यांची सर्वांत मोठी कामगिरी होती ती, सन २००१च्या संसद हल्ल्यामागील सूत्रधार गाझी बाबा याला यमसदनी पाठवण्याची.

 

 

रमण यांना प्रवासाचीही आवड होती. रमण आणि त्यांची पत्नी वीणा यांनी १९९१मध्ये त्यांच्या गाडीतून ३९ दिवस, सात तास आणि ५५ मिनिटांत जगभरात ४० हजार ७५ किमीचा प्रवास केला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज आणि लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली होती.

Exit mobile version