मुंबईत सध्या अनेक विकासकामे आणि सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पुलांची कामे, मुंबईचे सौंदर्यीकरण अशी विविध कामे सुरु आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या कामांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी आता १० कोटींच्या वरील कामांवर पालिकेच्या दक्षता विभागाची नजर असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या विविध भागात सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मुंबईचे सौंदर्यीकरण, पुलांची कामे आदी ३५ हजार कोटींची कामे सुरू आहेत. सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मुंबईचे सौंदर्यीकरण या कामावर काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला होता. मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्यात येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक कामांत पारदर्शकता यावी यासाठी थर्ड पार्टी ऑडिट केले जाते. मात्र, आता १० कोटींच्या वरील प्रत्येक कामांवर दक्षता विभागाची नजर असणार आहे.
मुंबईत सध्या ४०० किलोमीटर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत. सुरू असलेली कामे योग्य पद्धतीने होत आहे का, रस्ते कामांत वापरण्यात येणारे साहित्य योग्य आहे का, याची तपासणी केली जाते आहे. पावसाळापूर्व मुंबईभरात कोट्यवधींची कामे सुरू आहेत. या सर्व कामांची पहाणी केली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”
मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान
एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार
सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स प्रकरणांचा शिवकुमार यांना फटका?
गाळ काढण्याचे दर समान
गाळ उपसा करण्यासाठी नॉर्मल मशीन, शिल्ड पुशर मशीन आणि ट्रक्सर मशीन या तीन मशीनचा वापर केला जातो. परंतु गेल्या वर्षापर्यंत गाळ उपसा करणाऱ्या शिल्ड पुशर आणि ट्रक्सर मशीनचा वापर करण्यासाठी वेगळा दर आणि नॉर्मल मशीनचा वापर करण्यासाठी वेगळा दर देण्यात येत होता. नालेसफाईच्या कामाची पहाणी केल्यानंतर वेगवेगळे दर आकारले जात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर गाळ उपसा करण्यासाठी समान दर ठेवण्यात यावे या दक्षता विभागाच्या सूचनेचे यावर्षीपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.