माजी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांची महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवार, १९ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथ ग्रहण केली. विद्यासागर कानडे मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत. गुरुवारी राजभवनात कानडे यांच्या शपथविधीचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कानडे यांना शपथ दिली.
गेल्या जवळपास वर्षभरापासून राज्यातील लोकायुक्त हे पद रिक्त होते. न्यायमूर्ती कानडे यांच्या आधी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी हे लोकायुक्त म्हणून कार्यरत होते. पण गेल्यावर्षी २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर आता तब्बल एका वर्षानी कानडे यांची लोकायुक्त पदी नियुक्ती केली गेली आहे.
हे ही वाचा:
तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?
बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया
विद्यासागर कानडे यांनी १९७९ सालापासून मुंबई उच्च न्यायालयात आपल्या वकिलीची सुरुवात केली. त्यानंतर २००१ साली ऑक्टोबर महिन्यात त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली. २०१५ आणि २०१६ साली काही दिवस त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही कामकाज पाहिले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया आदी मान्यवर उपस्थित होते.