मुंबईची ऐतिहासिक व्हिक्टोरिया बग्गी लवकरच पुन्हा एकदा रस्त्यांवर दिसणार आहे. मात्र यावेळी त्याची खासियत असलेल्या घोड्यांच्या टापांचा आवाज तिला नसेल. बॅटरीवर चालणाऱ्या व्हिक्टोरिया गाड्या लवकरच दक्षिण मुंबईच्या काही रस्त्यांवर दिसणार आहेत. या गाड्या पुढच्या महिन्यापर्यंत रस्त्यावर येणे अपेक्षित आहे.
जवळपास एक शतके मुंबईत व्हिक्टोरिया टांग्यांनी लोकांची ने-आण केली आहे. राज्य वाहतूक विभाग गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात पुन्हा एकदा या नव्या बॅटरीच्या व्हिक्टोरिया चालवायला परवानगी देणार आहे. सुरूवातीच्या काळात सहा लोकांना नेऊ शकणाऱ्या दहा गाड्यांना गेटवे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, नरिमन पॉईंट या भागात परवानगी देण्यात येणार आहे. या गाड्यांसाठी भाड्याच्या दराची सुद्धा निश्चिती केली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने जुन २०१५ मध्ये घोड्याने ओढायच्या व्हिक्टोरिया गाड्यांवर आधिकृतरित्या बंदी घातली. त्यामुळे ज्या लोकांचे रोजगार बुडाले त्यांना या गाड्यांसाठीचा चालक परवाना देण्यात येणार आहे.
जुन्या जमान्याच्या व्हिक्टोरिया व्हिंटेज गाड्या झाल्यांने त्यांना पर्यटकांकडून मागणी आहे. नंतरच्या काळात या गाड्या शोभेच्या आणि चैनीचे प्रतिक झाल्या. व्हिक्टोरिया गाड्या हा मुंबईचा वारसा असल्याने या गाड्यांना पुन्हा एकदा रस्त्यावर नव्या रुपात धावडवण्यात येणार आहे.