मायक्रो आरएनएच्या शोधासाठी अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार

वैद्यकशास्त्रासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा

मायक्रो आरएनएच्या शोधासाठी अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार

जगभरात सर्वोच्च मानला जाणारा ‘नोबेल पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मायक्रो आरएनएच्या शोधासाठी दोघांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. व्हिक्टर ऍम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना मायक्रोआरएनएचा शोध आणि पोस्ट- ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील भूमिकेसाठी २०२४ चे फिजिओलॉजीमधील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे.

व्हिक्टर ऍम्ब्रोस यांचा जन्म १९५३ मध्ये हॅनोव्हर, अमेरिका येथे झाला. त्यांनी १९७९ मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एमआयटी) पीएचडी प्राप्त केली. १९८५ पर्यंत पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून तेथे कार्यरत राहिले. १९८५ साली ते हार्वर्ड विद्यापीठात मुख्य अन्वेषक बनले. १९९२ ते २००७ पर्यंत, त्यांनी डार्टमाउथ मेडिकल स्कूलमध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आणि सध्या ते वर्सेस्टर, एमए येथील मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूल विद्यापीठात नैसर्गिक विज्ञानाचे सिल्व्हरमन प्राध्यापक आहेत.

गॅरी रुवकुनचा यांचा जन्म १९५२ मध्ये बर्कले, अमेरिका येथे झाला. त्यांनी १९८२ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली, त्यानंतर १९८२ ते १९८५ पर्यंत एमआयटीमध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून काम केले. १९८५ मध्ये, ते मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये मुख्य अन्वेषक बनले. तेथे सध्या ते जेनेटिक्सचे प्राध्यापक आहेत.

हे ही वाचा..

झाकीर नाईकची व्हिडीओवर संतापाची लाट

मालदीवसाठी भारत सर्वात मोठे पर्यटन स्रोत

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनमधून करणार मतदान

डायनामाईटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नोबेल पारितोषिकाची सुरुवात १९०१ मध्ये झाली असून २०२४ पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील २२९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा मेडिसीन मधील नोबेल १० डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे.

Exit mobile version