शनिवार, ७ ऑगस्ट रोजी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भारतीय पोस्ट खात्याच्या एका नव्या टपाल तिकिटाचे प्रकाशन केले आहे. भारतीय पोस्ट खात्यातर्फे ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत भारतातील विविध क्षेत्रांमधील अज्ञान नायकांचा गौरव करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. एक थोर समाज सुधारक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या चमनलाल यांचे हे टपाल तिकीट आहे.
याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चमनलाल यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. चमनलाल यांचा जन्म १९२० साली सध्याच्या सियालकोट येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. युवा अवस्थेपासूनच समाज कल्याणासाठी काम करण्याचा उत्साह त्यांच्यात होता. शैक्षणिक जीवनात ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. आपल्या शैक्षणिक वर्षांमध्ये ते सुवर्णपदक विजेते होते. अनेक मोठमोठ्या नोकऱ्यांची संधी त्यांना समोरुन येत होती. पण तरीही त्यांनी फाळणीग्रस्तांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काम करण्याचा मार्ग त्यांनी निवडला.
हे ही वाचा:
सगळे पाण्याखाली…. ५३१० हेक्टर शेती, १२१० गावे
नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!
चमनलाल हे खऱ्या अर्थाने भारतीय संत होते. आपल्याकडचे दुसऱ्याला देणे आणि त्यांची काळजी वाहणे यावर त्यांचा विश्वास होता. याच तत्वज्ञानाचा त्यांनी अंगिकार केला असे श्री नायडू म्हणाले. संघाचे जागतिक पातळीवर जाळे तयार करण्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. परदेशात जाणाऱ्या भारतीयांना सोयीसुविधा मिळण्यासाठी त्यांनी काम केले.
आतंरराष्ट्रीय संस्कृती अभ्यास केन्द्राचे सरचिटणीस श्री अमरजीवा लोचन यांनी टपाल तिकीट प्रस्तावित केले तर श्री संखा समंता यांनी याचे आरेखन केले आहे. या स्मरणार्थ टपाल तिकीट सर्व टपाल तिकीट विक्रीत्यांकडे उपलब्ध आहे. ऑनलाईन हवे असल्यास (Visit : https://www.epostoffice.gov.in/ ). इथे संपर्क करा.