मराठी रंगभूमीवरील जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोघे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीतील ‘चॉकोलेट बॉय’ अशी श्रीकांत मोघे यांची ओळख होती. बालपणापासूनच मोघे यांना अभिनयाची आवड होती. आपल्या कारकिर्दीत मोघे यांनी साठ पेक्षा अधिक नाटके तर पन्नास पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले आहे. मोघे यांनी हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत सुद्धा अभिनय केला आहे. प्रपंच हा मोघे यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटाला राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते.
मोघे यांचे सिंहासन, उंबरठा, सूत्रधार, आम्ही जातो आमच्या गावा असे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. तर लेकुरे उदंड झाली, अश्रूंची झाली फुले, वऱ्यावरची वरात, अशी पाखरे येती, यासारखी अनेक नाटके प्रेक्षकांनी उचलून धरली. वाऱ्यावरची वरात आणि साक्षीदार या दोन नाटकांचे दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पहिले होते.
मोघे यांनी दूरदर्शन मालिकांमधूनही काम केले असून स्वामी मालिकेतील त्यांची राघोबा दादांची भूमिका विशेष गाजली. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना काशिनाथ घाणेकर पुरस्कार, गदिमा पुरस्कार, राज्य सरकारचा प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, राज्य शासनाचा कलागौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.