हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे शनिवार, २६ ऑगस्ट रोजी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी मुंबईतील त्यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील ज्युपिटर अपार्टमेंटमध्ये दुपारी २ वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
देव कोहली यांना नुकतेच अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दोन-तीन महिन्यांपासून दाखल करण्यात आले होते. सर्व उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे १० दिवसांपूर्वी त्यांना घरी पाठवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास झोपेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
देव कोहली यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४२ रोजी झाला होता. ते १९४८ मध्ये दिल्लीत आले आणि नंतर १९४९ मध्ये देहरादूनला स्थलांतरीत झाले. त्यांचे शिक्षण देहरादूनमध्ये झाले होते. शंकर-जयकिशनपासून ते विशाल आणि शेखरपर्यंत, देव कोहली यांनी १९६९ ते २०१३ पर्यंतच्या कारकिर्दीत संगीतकारांच्या वेगवेगळ्या पिढ्यांसोबत काम केले.
हे ही वाचा:
चाकरमान्यांना दिलासा; चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार
पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले
शरद पवारांची नवी भूमिका; पक्ष म्हणजे फक्त आमदार नाही तर संघटना
लखनऊ- रामेश्वर रेल्वे गाडीला आग लागून आठ जणांचा मृत्यू
त्यांचे लोकप्रिय गाणे “गीत गाता हूं मैं” हे राजकुमार-हेमा मालिनी अभिनीत ‘लाल पत्थर’ (१९७१) मध्ये प्रदर्शित झाले. गीतकार म्हणून हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. ‘मैने प्यार किया’साठी त्यांना आणखी १८ वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांनी नव्वदच्या दशकात आणि २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत ‘खिलाडी’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘बाजीगर’, ‘हम आपके है कौन…!’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’, ‘कांटे’ आणि ‘मुसाफिर’ यांसारखे असंख्य हिट चित्रपट दिले. त्यांची चलती है क्या ९ से १२, उंची है बिल्डिंग – ‘जुडवा २’, “आते जाते हसते गाते” – ‘गोलमाल अगेन’, “ओ साकी साकी” – ‘बाटला हाउस’ अशी अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.