‘खाष्ट सासू’ शशिकला यांचे निधन

‘खाष्ट सासू’ शशिकला यांचे निधन

जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. रविवार ४ एप्रिल रोजी शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्या ८८ वर्षांच्या होत्या. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शशिकला यांच्या निधनाबद्दल समाजातून शोक व्यक्त केला जात आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक अभिनेत्री म्हणून शशिकला यांनी दिलेले योगदान अतिशय वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. बिमला, सुजाता, आरती, अनुपमा, वक्त, गुमराह, खुबसूरत अशा विविध चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले.

चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात त्यांना दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. तर २००९ सालच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. २००७ साली त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत शशिकला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “प्रसिद्ध दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेत्री पद्मश्री शशिकला यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले” असे म्हणत फडणवीस यांनी आपला शोक व्यक्त केला.

तर शशिकला यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अभूतपूर्व आहे असे प्रफूल पटेल यांनी म्हटले आहे.

Exit mobile version