मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे शनिवार, १० ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले आहे. विजय कदम यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सकाळ विजय कदम यांची अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरी प्राणज्योत मालवली. विजय कदम हे गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाशी लढा देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. विजय कदम यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. विजय कदम यांच्या निधनानंतर कुटुंबावर आणि मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
विजय कदम यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे मराठी चित्रपट विश्व आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत आपली स्वतःची अशी वेगळी ओळख बनवली. चाहत्यांच्या मनात त्यांनी त्यांची छबी निर्माण केली. शनिवारी दुपारी २ वाजता विजय कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंधेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
हे ही वाचा :
इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हवाई हल्ला; १०० हून अधिक लोक ठार
ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; सर्व प्रवाशांसह क्रू मेम्बर्स दगावले
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम; अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक
अनिल देशमुखांच्या मागे पवार, ठाकरे !
विजय कदम यांनी रंगभूमी सोबतच मराठी चित्रपटात देखील काम केलं होतं. ‘विच्छा माझी पुरी कर’ हे त्यांचे लोकनाट्य जबरदस्त गाजले होते. त्यांचे काम पाहून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. १९८० च्या दशकात छोट्या-मोठ्या विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. लोकांनाही त्यांचे काम विशेष आवडत होते. त्यांचे चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी हे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.