मराठी सिनेसृष्टीत आपल्या विविधरंगी भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. शिवाय काही महिन्यांपासून ते टाटा रुग्णालयात उपचार देखील घेत होते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रविंद्र बेर्डे यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीचं त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. साधारण ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रवींद्र बेर्डे हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. सिंघम, चिंगी यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. यापूर्वी १९९५ मध्ये नाटकाच्या रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर २०११ साली त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले. मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे रवींद्र बेर्डे यांचे सख्खे बंधू आणि नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल
शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट
रविंद्र बेर्डे यांनी मराठी चित्रपट आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते. त्यांचे एकूणच व्यक्तिमत्व आणि काहीसा विनोदी स्वभाव यामुळे सुरुवातीला खलनायकी आणि नंतर विनोदी व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या.