ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेले काही दिवस दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळेच आता दिलीप कुमार यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रविवारी, ६ जूनच्या सकाळी अभिनेते दिलीप कुमार यांना खार येथील पी डी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही नियमित स्वरूपाच्या चाचण्या आणि तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सकाळी साडे अकराच्या सुमारास यासंबंधीची माहिती देण्यात आली. दिलीप कुमार यांना नॉन कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेले काही दिवस त्यांना जाणवत असलेला श्वसनाचा त्रास बळावल्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर नितीन गोखले यांच्या नेतृत्वात स्थानिक डॉक्टरांची टीम दिलीप कुमार यांच्यावर उपचार करत आहेत.
हे ही वाचा:
सलग आठव्या महिन्यात जीएसटी महसूल १ लाख कोटींच्या पार
केंद्र सरकारचा ट्विटरला दणका; कायदे मान्य करण्यासाठी शेवटची नोटीस
‘ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली’
दिलीप कुमार यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे कोविड महामारी सुरू झाल्यापासून ते कोणालाच भेटत नव्हते. दिलीप कुमार हे सध्या ९८ वर्षाचे असून वयोमानानुसार येणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी त्यांना जाणवत असतात. गेल्या महिन्यातही तब्येतीच्या कारणावरून दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.