श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा चर्चेत आला आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यात ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणण्याबाबत पडताळणी केली जात आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
श्रद्धा वालकर प्रकरणामुळे ‘लव्ह जिहाद’वरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ कायदा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर फडणवीस म्हणाले, याबाबत राज्य सरकारने अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण, इतर राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात सध्या हा विषय नसल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी फडणवीसांकडे दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. तसेच श्रद्धा वालकर हिची हत्या करणारा आरोपी आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विकास वालकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतसुद्धा त्यांनी ही माहिती दिली आहे.
हे ही वाचा :
‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने मुंबईला मिळणार नवे रुपडे
व्हिवो ,ओप्पो, शाओमी भारतातून निर्यात करण्याच्या मार्गावर
श्रद्धा वालकरचे वडील प्रथमच आले समोर, आफताबच्या कुटुंबियांबाबत केली ही मागणी
श्रद्धा हत्याप्रकरणी दिल्लीचे राज्यपाल, दिल्लीमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच तपास योग्य दिशेने सुरू आहे. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असेही विकास वालकर म्हणाले आहेत.