शुभमन गिलला झुकते माप का दिले जात आहे?

खराब कामगिरीबद्दल वेंकटेश प्रसाद यांनी सुनावले

शुभमन गिलला झुकते माप का दिले जात आहे?

शुभमन गिलने गेल्या काही वर्षात आपल्या कामगिरीची छाप पाडली असल्याचे मानले जात असले तरी भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी मात्र गिलच्या कामगिरीवर टीका केली आहे. आयपीएलमध्ये गिलने आपल्या तडाखेबंद फलंदाजीचा ठसा उमटविला पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला. त्यावरून वेंकटेश प्रसाद संतापले आहेत. कसोटी क्रिकेट खेळताना तो परदेशात मात्र सातत्य राखताना दिसून येत नाही, असा आक्षेप वेंकटेश प्रसाद यांनी घेतला आहे.

ट्विटरवर प्रसाद यांनी शुभमनच्या कामगिरीवर टीका केली आहे. गिलची निवड ही कामगिरीच्या आधारे नाही तर वशिलेबाजीमुळे झाली आहे. तो सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याला झुकते माप देऊनही अनेक क्रिकेटपटू त्याच्याबद्दल का बोलत नाहीत?

वेंकटेश प्रसाद म्हणाले आहेत की, मला शुभमन गिलबाबत आदर आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे. पण त्याची कामगिरी मात्र त्याला साजेशी नाही. ३० इनिंगनंतरही त्याची सरासरी अवघी ३० आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सरासरी अगदीच सामान्य आहे.

एखाद्याला एवढ्या संधी देऊनही तो अशा प्रकारची कामगिरी करत असेल तर त्याला काय म्हणणार? अनेक खेळाडू आज रांगेत आहेत, चांगली कामगिरी करत आहेत तरीही त्यांचा विचार होत नाही. पृथ्वी सावची कामगिरी चांगली होते आहे, सर्फराज प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार धावा करतोय आणि गिलपेक्षा आधी संधी दिली जावी असे अनेक लोक आहेत. काही जणांना यश मिळवेपर्यंत सातत्याने संधी दिली जाते तर काहींना तशी संधी मिळतही नाही.

हे ही वाचा:

मोमो खाण्याच्या पैजेनंतर तरुणाचा मृत्यू

भारतात पोहोचताच पंतप्रधानांनी घेतला दिल्लीच्या पूरस्थितीचा आढावा

अजित पवारांसह फुटीर आमदार अचानक शरद पवारांना भेटले

आयर्लंड दौऱ्यासाठी बुमराहचे पुनरागमन होण्याची शक्यता

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गिलला अपयश पाहावे लागले. या कसोटीत रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी शतके ठोकली. तर विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. ११ चेंडूंचा सामना करत शुभमन गिलने अवघ्या ६ धावा केल्या. त्यानंतर जोमेल वॉरिकनने त्याला बाद केले. भारताने ही कसोटी एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली हे खरे असले तरी शुभमनची ही कामगिरी चिंताजनक असल्याचे वेंकटेश प्रसाद यांचे म्हणणे आहे. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी २० जुलैपासून सुरू होत आहे.

Exit mobile version