दोन दिवसांपूर्वी संघासाठी जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या रोहन करंदीकर आणि हर्ष आघाव या जोडगोळीने १० व्या संतोषकुमार घोष (१६ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीला जवळजवळ निर्णायक विजयाच्या उंबरठय़ावर आणून सोडले आहे. कर्णधार हर्षने आज आपल्या ऑफस्पीन गोलंदाजीने मुंबई पोलीस जिमखान्याविरुद्ध ३० धावांत ६ बळी घेत त्यांना केवळ ८९ धावांत उखडले. अगस्त्य बंगेरा या दुसऱ्या ऑफस्पीनरने २ गडी बाद केले. दिवसअखेरीस वेंगसरकर अकादमीने १ बाद १४३ धावा असे प्रत्युत्तर दिले. यात रोहन करंदीकरने ९० चेंडूंत नाबाद ८३ धावा असे योगदान आहे. त्यात त्याने आठ चौकार मारले आहेत.
हे ही वाचा:
मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!
चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही
किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात सोमय्या करणार तक्रार
स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेतल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पोर्टस् फिल्डने दादर पारशी कॉलनीविरुद्ध ६५.२ षटकांत २४३ अशी चांगली धावसंख्या उभारली आणि खेळ संपताना प्रतिस्पर्ध्यांचे दोन मोहरे २९ धावांत बाद केले. उद्या पहिल्या डावातील आघाडीसाठी दोन्ही संघ संघर्ष करतील. सलामीचा वसीम खान (६४) आणि चौथ्या क्रमांकावरील यासीन सौदागर (४१) यांनी स्पोर्टस् फिल्डच्या डावाला आकार दिला. याशिवाय दहाव्या क्रमांकावरील आर्य गायकवाड (३०) याने चिराग मोडक (२२) यासह नवव्या विकेटसाठी केलेली 44 धावांची भागीदारी अतिशय मोलाची ठरावी. डावरा स्पीनर अखिलेश बराई (६५-५) दादर संघासाठी प्रभावी ठरला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेला संघटनेचे आजी-माजी सचिव अजिंक्य आणि संजय नाईक तसेच सुरज सामंत यांनी पाठबळ दिले आहे. सामंत यांनी स्पर्धेसाठी आवश्यक मैदाने उपलब्ध करून दिली आहेत.
स्कोअरबोर्ड
मुंबई पोलीस जिमखाना ४४.४ षटकांत ८९ (शाह मेहबूब आलम २१, हर्ष आघाव ३०-६, अगस्त्य बंगेरा २५-२) विरुद्ध दिलीप वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमी ३४ षटकांत १ बाद १४३ (रोहन करंदिकर खेळत आहे ८३, देवांश राव खेळत आहे ३३).
स्पोर्टस्फिल्ड क्रिकेट क्लब ६५.२ षटकांत २४३ (वसीम खान ६४, यासीन सौदागर ४१, आर्य गायकवाड ३०, अखिलेश बराई ६६-५, अंशुल मोर्जे ६०-३) विरुद्ध दादर पारशी कॉलनी १२ षटकांत २ बाद २९.