वाहनधारकाला वाहनासाठी नॉमिनी नेमता येणार

वाहनधारकाला वाहनासाठी नॉमिनी नेमता येणार

केंद्रिय परिवहन, भूपृष्ठ वाहतू व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार आता वाहनधारकांना वाहनांबाबतचा आपला वरसदार नेमता येणार आहे. त्यामुळे वाहनधारकाच्या मृत्युनंतर ते वाहन त्या वारसदाराला मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ मध्ये मोठे बदल करून वाहनधारकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. सध्या देखील, वाहन खरेदी करताना खरेदीदार त्या वाहनासाठी वारसदाराची नेमणुक करू शकतो, किंवा नंतरही त्याचे नाव जोडू शकतो. परंतु ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहेच शिवाय देशात सर्वत्र एकसारखी देखील नाही.

हे ही वाचा:

समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा

देशातील आणखी दोन राज्यात लॉकडाऊन

आवताडेंनी केले महाविकास आघाडीला उताणे

कोविड रुग्णांसाठी वायुरुप प्राणवायू वापरण्याबाबत मोदींकडून चाचपणी

नव्या नियमांनुसार जर वारसदार नेमायचा असेल, तर वाहन खरेदी करताना सदर वारसादाराची सर्व आवश्यक ओळखपत्रे जमा करावी लागतील. त्यामुळे वाहनधारकाचा मृत्यु झाल्यास तीन महिन्याच्या आत वारसदारांना त्या वाहनावर हक्क सांगता येईल. त्यासाठी सदर वाहनधारकाचा मृत्यु झाला असल्याचे मात्र नोंदणी कार्यालयाला मृत्युपासून तीस दिवसात कळवावे लागेल. त्यानंतर काही कागदपत्रांची पूर्तता करून साधारणपणे तीन महिन्यात वाहनाचा ताबा घेता येईल.

जर वाहनधारकाला आपला वारसदार बदलायचा असेल तर त्याचीही सोय या नव्या नियमांत करण्यात आली आहे. त्यासाठी वाहनधारकाला करायची प्रक्रिया देखील या नियमांत स्पष्ट करण्यात आली आहे.

सध्याच्या नियमांनुसार वाहनधारकाच्या मृत्युनंतर वाहनावर वारसदारांना आपला अधिकार सांगायचा असेल, तर त्याची प्रक्रिया खूप क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे. त्यासाठी अनेक कार्यालयांना वारंवार भेटी देत रहाव्या लागतात.

मंत्रालयाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी हे नियम प्रस्तावित केले होते. त्यावर लोकांकडून काही सुधारणा, सूचना देखील मागवल्या होत्या. आता या नियमांनुसार वारसदारांना वाहनावरील हक्क प्रस्थापित करणे सोपे होणार आहे.

Exit mobile version