अरुणाचल प्रदेशात चीन सीमेवर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असताना सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळल्यामुळे कोल्हापुरातील एका जवानाला वीरगती प्राप्त झाली आहे. सुनील विठ्ठल गुजर असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर उर्फ मलकापूर येथील ते रहिवासी आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
चीन सीमेवर रस्ता दुरुस्तीचे काम करत असताना सैन्य दलाचे वाहन ४०० ते ५०० फुट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात जवान सुनील विठ्ठल गुजर हे हुतात्मा झाले. ते २०१९ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. ११० बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये जवान सुनील गुजर हे ‘डोजर ऑपरेटर’ म्हणून कार्यरत होते.
मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना जवान सुनील गुजर हे ‘डोजर ऑपरेटर’ म्हणून काम करत होते. १३ मार्च रोजी त्यांचा डोजर घसरून खोल दरीत कोसळला आणि या अपघातात जवानाला वीर गती प्राप्त झाली. जवानाचे पार्थिव आज शनिवारी (१५ मार्च) संध्याकाळपर्यंत त्यांच्या गावी पोहोचण्याची शक्यता आहे. जवान सुनील गुजर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शित्तूरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा :
इस्रोची उपग्रह प्रक्षेपणातून ४३९ दशलक्ष डॉलर्सची कमाई
पाकसरकारच्या हट्टीपणामुळे आम्ही सर्व २१४ लष्करी बंधकांना ठार मारले!
शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कौतुक करत मानले आभार!
हमासचे केले समर्थन; कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेतून घरी परतली
जवान सुनील यांचा २०२२ मध्ये स्वप्नाली पाटील यांच्याशी विवाह झाला. आठ महिन्यापूर्वी काही दिवसाची रजा काढून ते गावी आले होते. पत्नीला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी ते अधिकच्या सुट्टीत प्रयत्नात होते. पुन्हा लवकरच परत येऊ असे सांगून आई-वडिलांसह पत्नीचा निरोप घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांना एक सहा महिन्याचा चिमुकला देखील आहे.