देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक रुग्णांना प्राणवायू मिळवण्यात अडचणी येत आहेत. अशा वेळेस हैदराबाद येथील एका स्टार्ट अपने ही समस्या दूर करण्यासाठी ‘वायुपुत्र’ नावाचे यंत्र तयार केले आहे. यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळून त्यांचे प्राण वाचवणे शक्य होईल.
हैदराबाद येथील ‘द फी फॅक्टरी’ या कंपनीने एक ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा तयार केली आहे. या कंपनीचे सह- संस्थापक प्रविण गोरकवी यांनी सांगितले की, घरगुती विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णाची प्राणवायू पातळी खालावली तर त्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. परंतु या प्रवासादरम्यान त्यांची प्राणवायू पातळी आणखी खालावून रुग्णांचा मृत्यु होण्याचे प्रमाण वाढते. हे रोखण्यासाठी प्रोजेक्ट वायुपुत्रची सुरूवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
जाणत्या-अजाणत्यांचे बार बार देखो
दिल्लीत १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स काळ्याबाजारातून जप्त
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ जाहीर
मुंबईतल्या निवासी डॉक्टर्सची महापालिकेकडून लूट?
त्याबरोबरच त्यांनी हे देखील सांगितले, की सध्या ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स अतिशय महाग किंमतीला उपलब्ध आहेत. यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांना परवडतीलच अशा किंमतीत उपलब्ध नसतात. त्यामुळे अशा रुग्णांसाठी हे यंत्र खूप फायद्याचे ठरेल असे सांगितले जात आहे.
या यंत्रात काही प्रक्रिया करून ऑक्सिजनची निर्मीती होते. ते एखाद्या मोठ्या वैद्यकीय उपकरण निर्मिती कंपनीसोबत कंत्राट करू इच्छितात. त्यामुळे या यंत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हायला सुरूवात होईल. या कंपनीला आत्ताच अनेक रुग्णांकडून या यंत्राबाबत विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ते हे तंत्रज्ञान खुले ठेवणार आहेत, जेणेमुळे अधिकाधीक प्रमाणात याचे उत्पादन होऊ शकेल. गोरकवी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही परवानग्या मिळाल्यानंतर हे उत्पादन १५ मे पर्यंत उपलब्ध होऊ शकेल. या उपकरणाची अंदाजित किंमत २,५०० रुपये असेल.