ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वसंत चव्हाण यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण हे आजारी असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
वसंत चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना आधी नांदेडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यांची प्रकृती अधिक ढासळल्याने त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्हा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी वसंत चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. वसंत चव्हाण यांचे असे अकाली जाणे आम्हा सगळ्यांसाठी धक्का आहे. अतिशय दुःखद घटना आहे. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आम्ही एकत्र काम केलं आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम लढा दिला. त्यांच्या अकाली जाण्याने नांदेड जिल्ह्याचं नुकसान झालं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा :
कन्नड आरोपी अभिनेत्याला तुरुंगात मिळतेय ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’, फोटो व्हायरल !
विकसित भारताचा पाया मजबूत होतोय !
पुण्यात कोयता गँगचा हैदोस, सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला !
दिल्ली: विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’ला धक्का, पाच नगरसेवक भाजपात !
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे २०२४ मध्ये लोकसभेत निवडून आले होते. वसंत चव्हाण १९७८ साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. नंतर त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. २००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तेथून पुढे तब्बल १६ वर्षे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतरावच ठरले.