पश्चिम रेल्वेच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार राहिलेल्या वसईचे दोन पुल उध्वस्त करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. भाईंदर खाडीवरील भाईंदर-पाणजू आणि पाणजू-नायगाव या मार्गावरील हे दोन्ही पूल उध्वस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.
१५६ वर्ष जुन्या असलेले हे दोन्ही पूल तत्कालीन बॉम्बे बरोडा अॅण्ड सेंट्रल इंडिया (बी.बी.अॅण्ड सी.आय) ने बांधलेले आहेत. या दोन्ही पुलांची एकत्रित लांबी १,९८० मी. आहे.
या पुलाचे दोन भाग पाडण्यात आले होते. पहिला पूल हा पूल क्र. ७३ भाईंदर-पाणजू असा असून त्याची लांबी १,४३० मीटर आहे, तर पूल क्र. ७५ पाणजू- नायगांव असा आहे. या पुलाची लांबी ५५० मीटर लांब आहे. दोन मार्गिका असलेल्या या दोन्ही पुलांची रुंदी सहा मीटर आहे.
सध्या पश्चिम रेल्वे या नावाने ओळखली जाणारी ही रेल्वे पुर्वी बॉम्बे बरोडा अॅण्ड सेंट्रल इंडिया या नावाने ओळखली जात असे. भारतात १६ एप्रिल १८५३ या दिवशी बोरिबंदर-ठाणे या ऐतिहासिक मार्गावर पहिली रेल्वे धावली. त्यानंतर १४ वर्षांनी बॅकबे- विरार या मार्गावर पहिली बी.बी. अॅण्ड सी.आय. रेल्वे १२ एप्रिल १८६७ या दिवशी धावली.
मुंबई- दिल्ली या महत्त्वाच्या मार्गावर हे दोन्ही पुल अतिशय उपयुक्त होते. त्यांच्या सुवर्णकाळात या पुलांवरून सर्व प्रकारच्या गाड्यांची वाहतूक चालत असे. चर्चगेट- विरार लोकल, लांब पल्ल्याच्या मेल ऐक्सप्रेस, पॅसेंजर आणि मालवाहक गाड्या देखील धावत असत. राजधानी एक्सप्रेस, फ्रंटियर मेल, जम्मू-तावी एक्सप्रेस यासारख्या महत्त्वपूर्ण गाड्या देखील या पुलांवरून जात असत.
पाणजू बेटावर राहणारे रहिवासी नायगांव गाठण्यासाठी या पुलांचा वापर करत असत. साधारणपणे १,५०० लोकसंख्या असलेल्या या बेटावरील लोक नायगांव-पाणजू दरम्यानची बोट चुकल्यावर पुलाचा वापर करत असत.
गेली कित्येक शतके उभ्या असलेल्या पुलांशी लोकांचे भावनिक नाते निर्माण झाले होते. मात्र आता, त्या पुलांना उध्वस्त केले जात असताना पहावे लागत आहे.