प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर या त्यांनी केलेल्या एका जाहिरातीमुळे अडचणीत सापडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी वर्षा यांनी ऑनलाइन मासे विकणाऱ्या एका ऍपसाठी जाहिरात केली होती. या जाहिरातीत त्यांनी ‘बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले’ असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोळी समाजाच्या भावना दुखावल्यामुळे वर्षा उसगांवकर अडचणीत आल्या होत्या.
या जाहिरातीनंतर संतप्त कोळी समाजाने वर्षा उसगांवकार यांना इशारा दिला होता, या वक्तव्यासंबंधी त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी दिला होता.
यानंतर वर्षा उसगांवकर यांनी कोळी समाजाची जाहीर माफी मागितली आहे. “या जाहिराच्या माध्यमातून माझ्याकडून कोळी समाजाच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझ्या मनात कोळी समाजाबद्दल नितांत आदर आहे,” असे म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.
हे ही वाचा:
मॉस्कोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा
शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक
थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?
पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला
अभिनेते जयवंत वाडकर यांनीही व्यक्त केली नाराजी
अभिनेते जयवंत वाडकर यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्वतः एक कोळी आहे. एका जाहिरातीसाठी वर्षा यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं असून कोळी माणूस हा अत्यंत दिलदार आहे आणि तो असं कधीच करणार नाही. त्या ऍपला मासे कोण पुरवतं? त्यांना आमच्याकडूनच मासे घ्यावे लागतात.”