‘असे तर होणार नाही ना की, मोदीजींनी घरात भांडण लावून दिले?’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोलणे ऐकून काशीच्या महिलांमध्ये हास्याची लकेर उमटली. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दुपारी करखियांवस्थित बनास डेअरीमध्ये गीय गायी पाळणाऱ्या ५१ महिलांची भेट घेतली. काशीतून निघाल्यानंतर पंतप्रधानांनी शनिवारी एक्सवर महिलांशी केलेल्या चर्चेचा हा व्हिडीओ पोस्ट केला.
महिला शक्तीचे सशक्तीकरण आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बाबा विश्वनाथनगरीतील माता आणि बहिणींकडून हे जाणून आनंद झाला की, गीर गाय मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनात खूप बदल झाला आहे, असे मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले.
हे ही वाचा:
‘आज कोणीही मनमानीपणे आपल्या इच्छेविरोधात व्हिटो करू शकत नाही’!
वडेट्टीवारांनी केले जरांगेंच्या भाजपा प्रवेशाचे सुतोवाच…
“लोणावळ्यातील सभेवेळी जरांगेनी बंद दाराआड कोणती डील केली?”
उत्तराखंडमधील हल्दवानी दंगलीचा मास्टरमाइंड अब्दुल मलिकला अटक
एका महिलेने त्यांना सांगितले की, त्यांची गीर गाय दररोज १७ ते १८ लिटर दूर देते. त्यावर मोदी म्हणाले की, आम्ही गुजरातमध्ये असा नियम केला होता की, कोणत्याही पुरुषाला दुधाचे पैसे देऊ नका. थेट महिलेला द्या. इथे गुजरातसारखी व्यवस्था झाली की नाही?, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, आज मी सांगून जात आहे की, दुधाचे पैसे महिलांच्याच खात्यात जातील. मग असे तर होणार नाही ना की मोदीजींनी घरात भांडण करून दिले…’ असे मोदींनी म्हणताच उपस्थित महिलांमध्ये हास्याची लकेर उमटली.
एका महिलेने गीर गाय आल्यामुळे दर महिन्याला सुमारे आठ ते नऊ हजारांची कमाई होत असल्याचे सांगितले. त्यावर तुम्ही इतकी कमाई करू लागलात म्हणजे तुमची दादागिरी तर वाढली असेल, असा प्रश्न विचारताच महिला पुन्हा हसू लागल्या. तर, दुसऱ्या महिलेने गायीचे शेण घेऊन त्यापासून त्या खत बनवत असून त्यांची विक्रीही त्या करत असल्याचे सांगितले. त्यावर मोदीजींनी तुम्ही तर स्टार्टअप सुरू केला आहे, अशा शब्दांत या महिलेचे कौतुक केले.