भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या राज्यांमधील डोंगराळ भाग आणि शहरे रेल्वे मार्गाच्या माध्यमातून इतर भागाशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य भागात सिक्कीम, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार पर्यंतच्या परिसरात नवे रेल्वे रूळ टाकण्याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
ईशान्य क्षेत्रात सिक्कीम, भूतान, बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्चून करण्यात येणारे पाच रेल्वे रुळांचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत सिक्कीमच्या रंग्पो ते गंगटोकपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुढे या रेल्वे मार्गाला नाथूलापर्यंत नेले जाणार आहे. मंजुरी अंतिम टप्प्यात असून त्याचे काम लवकरच सुरू होईल.
त्रिपुराला बांगलादेश आणि आसामला भूतानशी जोडणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय सीमा रेल्वेमार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. आणखी तीन रेल्वे प्रकल्प आहेत. या माध्यमातून भारताला सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमापार रेल्वे प्रकल्पांतर्गत त्रिपुराची राजधानी आगरतला ते बांगलादेशातील अखौरा रेल्वेस्थानक जोडले जाईल. एकूण ८६२ कोटींच्या प्रकल्पात भारताचा पाच आणि बांगलादेशचा १० किलोमीटरचा भाग येतो. याठिकाणी जून- २०२४ मध्ये पहिली चाचणी होईल.
हे ही वाचा:
६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात
ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन
आनंद साजरा करण्यासाठी बुमराह परतला मायदेशी
गुलाम नबी आझाद यांच्या समावेशामुळे काँग्रेसचा तीळपापड
डिसेंबरपर्यंत रेल्वेमार्ग सुरू होईल. त्यामुळे आगरतला ते ढाका व कोलकाता येथे जाण्यास सहा तास लागतील. मणिपूरच्या इम्फाल ते मोरेहपर्यंत रेल्वे रूळ टाकले जात आहेत. मोरेह म्यानमार सीमेवर भारताचा शेवटचे क्षेत्र आहे. प्रकल्पाची डेडलाइन डिसेंबर २०२४ आहे. दोन तृतीयांश काम पूर्ण झाले. नंतर हा मार्ग म्यानमारच्या तमू ते थायलंडपर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले.