केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी बहुप्रतीक्षित अशा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या स्लीपर कोच अर्थात शयनयान डब्यांची संकल्पित छायाचित्रे जाहीर केली आहेत. इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) यांनी संयुक्तपणे या डब्यांची निर्मिती केली आहे.
शयनयान डब्यांची संकल्पित छायाचित्रे जाहीर करताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनि वैष्णव यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची शयनयान श्रेणी २०२४च्या सुरुवातीला दाखल होईल, असे सांगितले आहे. गेल्याच आठवड्यात एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मधील शयनयान डबे फेब्रुवारी २०२४मध्ये दाखल होतील, अशी माहिती दिली होती.
हे ही वाचा:
चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज
‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार
आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
वैष्णव यांनी जाहीर केलेल्या छायाचित्रांवरून आता भारतीयांना आलिशान, सुखनैव आणि सर्व सुविधांनी युक्त असा रेल्वेप्रवास करता येईल, अशी आशा वाटू लागली आहे. या शयनयान डब्यांचे डिजाइन लाकडाने साकारले असून अधिक आकर्षक आहे. यातील आसनव्यवस्थाही अधिक आरामदायी असणार आहे. अधिक उजेड मिळावा, यासाठी डब्यात आणि डब्याच्या छतावरही अधिक प्रकाशमान दिवे असतील.
पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९मध्ये हिरवा कंदील दाखवला होता. नवी दिल्ली ते वाराणसी अशी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावली होती. आता हे शयनयान डबे सध्या सुरू असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या ताफ्यात जोडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास केलेल्या प्रवाशांनी सुचवलेल्या उपायांनुसार, या रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये बदल करून ते अधिक आरामदायी करण्यात आले आहेत. या नव्या वंदे भारत ट्रेननाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच महिन्यात हिरवा कंदील दाखवला होता. पाणी बाहेर पडू नये, यासाठी वॉश बेसिन अधिक खोल करण्यासह आसन व्यवस्था अधिक आरामदायी होण्यापर्यंत अनेक बारीकसारीक तपशिलांकडे लक्ष देण्यात आले आहे.