हरहुन्नरी कलावंत वैभव मांगले २७ मार्चपासून सुरू होत असलेल्या भयमालिकेत प्रेक्षकांना दिसणार असून त्यात त्याची विशेष अशी भूमिका असेल. बऱ्याच दिवसांनी भयमालिका टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.
रात्रीस खेळ चालेच्या आठवणी ताज्या असताना या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना झी-मराठी वाहिनीवर येणाऱ्या ‘चंद्रविलास’ या भयमालिकेतील भूमिकेबद्दल अभिनेता वैभव मांगलेने मनमोकळा संवाद साधत आपल्या भूमिकेबद्दल सांगितले. मालिका, अभिनय आणि कथानक यावर त्याने प्रकाश टाकला.
या मालिकेबद्दल किंवा भूमिकेबद्दल सांगताना वैभव म्हणाला की, या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ‘चंद्रविलास’ ही भयपट मालिका आहे आणि या मालिकेत मी नरहरपंतची भूमिका साकारत आहे. हा दोनशे वर्षांचा आत्मा आहे. हा ‘चंद्रविलास’ मध्ये का आहे? आणि ‘चंद्रविलास’ वाड्याची काय खासियत आहे? तो ‘चंद्रविलास’ मध्ये माणसांना का बोलवतो? त्याची उत्सुकता पहिल्या एपिसोडपासून दिसेल आणि त्या आत्माच्या जोडीला अजून एक भूत आहे. त्याच्याबद्दलही प्रेक्षकांना हळू हळू मालिकेतून कळत जाईल.
हे ही वाचा:
करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर पाकिस्तानची शुल्क सक्ती
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची ‘पासिंग आऊट परेड’
कॅगचा अहवाल आला; महापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांचा बुरखा फाटणार
हक्कभंगप्रकरणी संजय राऊत यांचा खुलासा समाधानकारक नाही, म्हणून…
भयमालिकेत काम करणार असला तरी त्याला स्वतःला भयपट फारसे आवडत नाहीत. त्याबाबत तो म्हणतो की, मला भयपट विशेष आवडत नाही. कारण मला भयपटाची प्रचंड भीती वाटते. भयपटातील संगीताने मला प्रचंड घाबरायला होतं. दचकायला होतं. त्यामुळे मी लहानपणी भयपट पाहिलेलेच नाहीत. तसंच मी अलिकडेच काळातही भुताचा चित्रपट पाहिलेला नाही. पण मुळात भीती ही नैसर्गिक भावना आहे. कारण माणूस घाबरला नाही तर तो जिवंत राहू शकणार नाही.
भुताच्या त्या मेकअपला लागतो दीड तास
अलबत्या गलबत्या या लहान मुलांच्या नाटकातील वैभव मांगलेचा एकूणच गेटअप चांगलाच चर्चेत होता. त्यामुळे या मालिकेत त्याचे एकूण रंगरूप कसे असेल याविषयी उत्सुकता आहे. तो याबाबत म्हणतो की, या मालिकेत माझा लूक वेगळा आहे. फार खतरनाक लूक आहे. पांढरा फिकट पडलेला तो आत्मा, त्याचे पिवळा रंगांचे डोळे हे खूपच भीतीदायक आहे. तास दीड तास हा माझ्या मेकअपमध्येच जातो. “चंद्रविलास” ही रहस्यमय भयकथा २७ मार्चपासून रात्री ११ वाजता झी मराठीवर दिसणार आहे.