जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माघार घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांना ठार मारले, कारण त्यांचा हेतू भारतात दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा आणि भारताचे नुकसान करण्याचा होता.
‘धर्म विचारून दहशतवादी मारत नाहीत’ या वादग्रस्त विधानानंतर वडेट्टीवार यांच्यावर टीकेचा भडिमार झाला, तेव्हा त्यांनी एक व्हिडीओ जारी करून सफाई दिली. त्यांनी म्हटले, पहलगाम येथील हल्ला हा भारताच्या एकतेवर हल्ला करण्याचा कट होता. या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य उद्देश दोन धर्मांमध्ये दरी निर्माण करणे, भारताच्या एकतेला बाधा आणणे आणि देशात अस्थिरता निर्माण करणे होता. दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. भारत सरकार जे काही कारवाई करेल, काँग्रेस त्याला पाठिंबा देईल. भारताच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा देशविघातक प्रवृत्तींचा नायनाट करणे आवश्यक आहे. भारत एक आहे आणि एक राहील.
हेही वाचा..
बातमीत “दहशतवादी” ऐवजी “मिलिटंट” शब्द लिहिणाऱ्या बीबीसीला केंद्राचे पत्र
“दहशतवाद्यांकडे धर्म विचारून मारण्याइतका पुरेसा वेळ नाही”
भारत- नेपाळ सीमाभागातील २५० हून अधिक बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई!
पहलगाम हल्ल्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या नेहा सिंग राठोड विरोधात गुन्हा
यापूर्वी सोमवारी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले होते, “दहशतवाद्यांकडे एवढा वेळ नसतो की ते मरणाऱ्याच्या कानात जाऊन विचारतील की तू हिंदू आहेस की मुसलमान. या संपूर्ण प्रकरणात अनेक गोष्टी आहेत, लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलत आहेत. अनेक विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो. दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे, त्यामुळे त्यांना पकडून कठोरतम कारवाई करावी लागेल. संपूर्ण देशाची हीच भावना आहे. मात्र, वेगवेगळ्या चर्चा करून मूळ मुद्द्यांपासून भरकटणे चुकीचे आहे.
वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानावर गदारोळ झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. वडेट्टीवार यांच्या विधानावर भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी टीका केली आणि म्हटले की काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाकिस्तानला क्लीन चीट देण्यासाठी स्पर्धा लागली आहे. विजय वडेट्टीवार म्हणत आहेत की पहलगामसाठी सरकार जबाबदार आहे. दहशतवादी धर्म पाहून हत्या करत नाहीत. हे लोक ऑल पार्टी मिटिंगमध्ये म्हणतात की पाकिस्तानविरुद्ध कारवाई करावी, पण बाहेर पडल्यावर पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास नकार देतात.