संपूर्ण देशात कोरोनाचे तांडव चालू असताना लसींबाबत अत्यंत आश्वासक आणि दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून समोर आली आहे. ज्या लोकांनी भारतातील कोविड-१९ वरील लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण खूप कमी असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयातर्फे सांगण्यात आली आहे.
हे ही वाचा:
सरकार आपली जबाबदारी झटकत आहे- उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे
रेमडेसिवीरबाबत राज्याला केंद्राकडून दिलासा
माकप नेते सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन
मोदींचे आज जागतिक पर्यावरणीय बदल परिषदेत संबोधन
मंत्रालयाने दिलेल्या डेटानुसार सुमारे ९३ लाख कोवॅक्सिनची पहिली मात्रा देण्यात आली, त्यापैकी सुमारे ४,२०८ लोकांना कोविडची लागण झाली. म्हणजे केवळ ०.०४ टक्के लोकांना कोविडची लागण झाली. त्याचप्रमाणे दुसरी मात्रा घेतलेल्या १७ लाख लोकांपैकी केवळ ६९५ (०.०४ टक्के) लोकांना कोविडची लागण झाली.
कोवॅक्सिन प्रमाणेच कोविशिल्डही प्रभावशाली लस ठरली आहे. कोविशिल्डची पहिली मात्रा दिलेल्या १०.०३ कोटी लोकांपैकी १७,१४५ किंवा ०.०२ टक्के लोकांना कोविडची लागण होऊ शकली तर, दुसरी मात्रा दिलेल्यांच्या बाबत ही टक्केवारी फक्त ०.०३ टक्के आहे.
भाराताच्या लसीकरण मोहिमेचा अधिकांश भार या दोन लसींवर आहे. सिरम इन्स्टिट्युटचे उत्पादन असलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने निर्माण केलेली कोवॅक्सिन या लसींवर आधारित भाराताची लसीकरण मोहिम चालू आहे. त्याबरोबरच भारताने स्पुतनिक या लसीच्या आयातीला देखील परवानगी दिली आहे. त्याबरोबरच इतर चार लसींच्या वापरासाठी देखील जलदगती धोरण स्वीकारले आहे.