संपूर्ण जग सध्या कोविड-१९ महामारीचा सामना करत आहे. त्याविरुद्ध लसीकरण एक प्रभावी अस्त्र असल्याने जगात लसीकरणावर भर दिला जात आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबवली जात असताना, लसीकरणाला वेग देण्यासाठी लस उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार यांनी यासंदर्भात बोलताना माहिती दिली होती. देशातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लस उत्पादनात भरगोस वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशातील लस उत्पादन २.५ लाख प्रतिदिनापासून ते ४० लाख प्रतिदिनापर्यंत वाढवण्यात आले आहे.
त्या म्हणाल्या, “सुरूवातीला साधारणपणे अडीच लाख प्रतिदिन एवढ्या प्रमाणात लस उत्पादन केले जात होते. हे उत्पादन आजपासून वाढवून आज ४० लाख लस प्रतिदिन एवढे करण्यात आले आहे. मला असं वाटतं की, लोकांचे लसीकरण अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी वाढवलेले लसोत्पादन नक्की उपयोगी ठरेल.”
त्याबरोबरच त्यांनी आज भारताने ५० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केला असल्याबद्दल देखील आनंद व्यक्त केला. हा अतिशय अभिमानाचा क्षण असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सरकार विविध माध्यमांद्वारे कोविड १९ विरूद्धच्या लढाईत लसीकरण महत्त्वाचे असल्याचे वारंवार सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
कोविडची होणार हार, लसीकरण ५० कोटी पार
…म्हणून तेजस ठाकरेंची व्हिव्हियन रिचर्ड्स सोबत तुलना! नार्वेकरांचा खुलासा
मुंबईच्या किनाऱ्यावर आढळली धक्कादायक गोष्ट
नितीन गडकरी हा ब्रिलियंट माणूस
यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी बालकांसाठीच्या लसीकरणावर देखील भाष्य केले. अधिकाधीक लोकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील असून लहान मुलांसाठीची लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार यादृष्टीने प्रयत्नशील असून विविध मानकांवर लस उपयुक्त ठरली पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले. लहान मुलांच्या लसीची चाचणी सध्या चालू असून त्यामध्ये सुरक्षेच्या मुद्द्याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. आम्ही लवकरच लहान मुलांसाठीची लस उपलब्ध करून देऊ शकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
मंत्री महोदयांनी कोविड काळातील माध्यमांच्या भूमिकेचे कौतूक केले आहे. केंद्र सरकार माध्यम प्रतिनिधींच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.