हिंदू धर्मात अतिशय महत्वाची मानली जाणारी चार धाम यात्रा रद्द करण्यात आली आहे. देशातील कोविड परिस्थिती लक्षात घेता उत्तराखंड सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी गुरुवारी यासंबंधीची घोषणा केली आहे. त्यामुळे पवित्र अशा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि जमनोत्री या चार स्थळांचे दर्शन भाविकांना घेता येणार नाहीये.
देशभर सध्या कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक राज्यात वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले आहेत. उत्तराखंडही त्याला अपवाद नाही. याआधीच उत्तराखंडमधील कुंभमेळा हा कोविडच्या कारणाने लवकर समाप्त करण्यात आला. तर आता चार धाम यात्रा रद्द करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत आणि पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्यात फोनवर चर्चा होऊन नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी गुरूवार, २९ एप्रिल रोजी माध्यमांशी बोलताना चार धाम यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय सांगीतला आहे. पण यात्रा जरी रद्द करण्यात आली असली तरीही चारही तिर्थक्षेत्र बंद राहणार नाहीत. पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा आणि इतर धार्मिक विधी सुरू राहणार आहेत. १५ मे रोजी गंगोत्री आणि यमनोत्री ही स्थाने खूली असतील, तर १७ मे रोजी केदारनाथ स्थान खुले असेल आणि बद्रीनाथ तिर्थक्षेत्र १८ मे रोजी खुले राहिल.
हे ही वाचा:
“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स
कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ
रेड्डीला झालेली अटक हा राज्यातील प्रत्येकाचा विजय
चार धाम यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्येही कोरोना प्रादुर्भावामुळे चारधाम यात्रा रद्द करण्यात आली होती. उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी हा निर्णय घेतला होता. पण तेव्हा स्थानिक नागरिकांसाठी मात्र ही तिर्थक्षेत्रे दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती.