आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदाराच्या बोटाला लावल्या जाणाऱ्या अमिट शाईच्या साडेसव्वीस लाख बाटल्यांचा वापर केला जाणार आहे. या शाईची एकमेव उत्पादक कंपनी मैसूर पेंट्स अँड वार्निश लि. (एमपीव्हीएल) यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, २० मार्चपर्यंत सर्व राज्यांपर्यंत त्यांच्या वाट्याची शाई पोहोचवली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने या शाईच्या साडेसव्वीस लाखांहून अधिक बाटल्या उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती कर्नाटक सरकारच्या या कंपनीचे संचालक मोहम्मद इरफान यांनी दिली. मतदानानंतर डाव्या बोटावर गडद जांभळी खुण देणारी ही शाई देशातील निवडणुकीच्या पारदर्शकता आणि निष्पक्षतेचाही रंग आहे. दिल्लीस्थित औद्योगिक अनुसंधान परिषद-राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळाद्वारा विकसित या शाईचे उत्पादन ही कंपनी सन १९६२पासून करत आहे.
इरफान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने २.६५ लाख लिटर शाईचे उत्पादन करण्याचे निर्देश दिले होते. त्यातील एक लाख ५९ हजार लिटर शाई राज्यांना देण्यात आली आहे. आतापर्यंत काचेच्या बाटल्यांमधून ही शाई पाठवली जात असे. आता मात्र प्लास्टिकच्या बाटल्यांतून ही शाई पाठवली जात आहे.
एका बाटलीतून ७०० लोकांच्या बोटावर शाई
१० मिलीच्या एका काचेच्या बाटलीचा वापर ७०० लोकांच्या बोटावर खूण केल्यासाठी केला जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे एका मतदानकेंद्रावर १२०० मतदार असतात. देशात यंदा १२ लाख मतदान केंद्रे उभारली जातील.
हे ही वाचा:
अभिनेत्री विद्या बालन चे बनावट खाते तयार करून फसवणूक!
कल्याण रेल्वे स्थानकातून डिटोनेटर्सचा साठा जप्त!
लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!
भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली!
२०१९च्या तुलनेत सात कोटी मतदार वाढले
निवडणूक आयोगाच्या तुलनेत देशात ९७ कोटी मतदार आहेत. सन २०१९मधील लोकसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या ९० कोटी होती. सन २०१९मध्ये आयोगाने २६ लाख बाटल्या शाईची ऑर्डर दिली होती.
२५हून अधिक देशांमध्ये निर्यात
भारताशिवाय एमपीव्हीएल कंपनीची शाई कॅनडा, घाना, नायजेरिया, मंगोलिया, मलेशिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसहित २५हून अधिक देशांना निर्यात केली जाते.