देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधानांनी शनिवारी उशीरा कोविड आढावा बैठक घेतली. त्यामध्ये कोरोनावर उपाययोजना करताना आणि लसीचे उत्पादन वाढवताना देशातील उपलब्ध क्षमतेचा पूर्ण वापर करा असा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशासनाला दिला आहे. त्यासाठी खासगी आणि सार्वजनिक भागिदारी वाढवा असाही आदेश त्यांनी दिला.
शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लसीची स्थिती, ऑक्सिजनचा सप्लाय, औषधे आणि व्हेन्टिलेटरची उपलब्धता या विषयांवर सखोल माहिती घेतली आणि त्याचा विविध पैलूंवर चर्चा केली.
कोरोनाचे परिक्षण, ट्रॅकिंग आणि उपचार याला कोणताही पर्याय नाही असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. पंतप्रधानांना रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला. देशात रेमडेसिवीरची उपलब्धता लवकरात लवकर करुन द्यावी असा आदेशही त्यांनी दिला. कोरोनाच्या उपचारामध्ये अँटी व्हायरल म्हणून उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन आता दुप्पट करण्याची परवानगी केंद्र सरकारने औषधं कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक महिन्यात होणारे ३८.८ लाख रेमडेसिवीरचे उत्पादन आता ७८ लाख होणार आहे. तसेच खासगी औषधं कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीमध्येही घट केली आहे. त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढाईला मोठा हातभार लागणार आहे.
हे ही वाचा:
शिवसेना नेत्याने पुन्हा पातळी सोडली
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, कुंभमेळ्याविषयी महत्वाचा निर्णय
ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस
मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी
त्याचसोबत पंतप्रधानांनी व्हेन्टिलेटरची उपलब्धता आणि कोरोनाच्या लसीकरणाची स्थिती जाणून घेतली. देशातील कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग आणखी वाढवण्याचा आदेश त्यांनी दिला. कोरोनाच्या लसीच्या तुटवड्याच्या बातम्या येत असताना त्यांनी लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक भागिदारी वाढवण्याचे आदेश दिले आहेत.