सर्वोच्च न्यायालयातील आचाऱ्याच्या मुलीने अमेरिकेतील प्रतिथयश विद्यापीठांत कायद्यात मास्टर्स पदवी मिळवण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बुधवारी तिचा सत्कार केला. या मुलीला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अथवा युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये शिकण्याची संधी मिळणार आहे.
सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश बुधवारी सकाळी येथील हॉलमध्ये जमले होते, तेव्हा त्यांनी आचारी अजय कुमार समल यांची मुलगी प्रज्ञा हिला उभे राहून मानवंदना दिली. ‘आम्हाला माहीत आहे की, प्रज्ञाने हे सर्व काही स्वतःच्या बळावर मिळवले आहे. आता भविष्यात तिला जे काही आवश्यक आहे, ते मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तिने देशाची सेवा करण्यासाठी परत यावे, अशी आमची अपेक्षा आहे,’ असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. ते तिचे ध्येय उत्कृष्टपणे साध्य करेल आणि ती १.४ अब्ज लोकांची स्वप्ने आपल्या खांद्यावर अगदी सहजतेने घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चंद्रचूड यांनी २५ वर्षीय प्रज्ञाला सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी स्वाक्षरी केलेली भारतीय राज्यघटनेवरील तीन पुस्तके भेट दिली. सरन्यायाधीशांनी प्रज्ञाच्या पालकांचा शाल देऊन सत्कार केला.
हे ही वाचा:
अनिल परबांकडून रमजान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी
“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”
सीएएला राज्यांचा विरोध निरुपयोगी; प्रक्रियेचा राज्यांशी संबंध कमी !
कोल्हापूर: लसीचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही महिलेचा रेबीजने मृत्यू!
प्रज्ञा हिने सर्वांचे आभार मानले. वडिलांच्या आणि आईच्या मदतीमुळेच आपल्याला कारकिर्दीत इतकी उंची गाठता आली, असे तिने सांगितले. ‘मी त्यांचे मूल असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या शालेय दिवसांपासून त्यांनी मला मदत केली आहे आणि मला जे मिळावे, असे त्यांना वाटत होते, ते मिळण्यासाठी त्यांनी नेहमीच काळजी घेतली,’ असे प्रज्ञा म्हणाली. कायदेशीर क्षेत्रात प्रवेश करण्याची तिची प्रेरणा सरन्यायाधीश चंद्रचूड होते, याचाही तिने आवर्जून उल्लेख केला. ‘न्यायालयातील सुनावणीच्या लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रत्येकजण त्यांना बोलताना पाहू शकतो. ते तरुण वकिलांना प्रोत्साहन देतात आणि त्याचे शब्द रत्नांसारखे असतात. ते माझे प्रेरणास्थान आहेत, ‘ असे प्रज्ञा म्हणाली.