देशामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) प्राथमिक परिक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २७ जून २०२१ रोजी होणाऱ्या या परिक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे प्रशासनातील विविध स्तरांवरील, जागांसाठी देशात या परिक्षा घेतल्या जातात. ही परिक्षा तीन टप्प्यात घेतली जाते, प्राथमिक (प्रिलिमनरी), मुख्य (मेन्स), मुलाखत (इंटर्व्ह्यु). या परिक्षेतून भारतीय प्रशासनातील अधिकारी तसेच पोलिस आणि विदेश सेवांमधील अधिकाऱ्यांची निवड होते.
हे ही वाचा:
मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?
इलॉन मस्कचा बिटकॉइनवरही परिणाम
मेट्रोची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस
दक्खनच्या राणीच्या फेऱ्याही कोरोनामुळे रद्द
युपीएससी २०२१ मध्ये तब्बल ७२१ जागांसाठी ही परिक्षा घेणार होती, ज्यात २२ जागा दिव्यांगांसाठी देखील होत्या. युपीएससीच्या उमेदवारांनी एखादे पद प्राप्त करून घेण्यासाठी या तीनही टप्प्यातून यशस्वीपणे पार व्हावे लागते.
कोविडमुळे २०२० मधील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला फटका बसला होता. त्यावेळी ३१ मे रोजी होणारी परिक्षा ४ ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळच्या निवडप्रक्रियेमधील मुख्य लेखी परिक्षेपर्यंतचा टप्पा पार पडला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्या वर्षीच्या मुलाखतीचा टप्पा अजूनही होऊ शकलेला नाही. युपीएससीने त्यांच्या इतर परिक्षाही पुढे ढकलल्या आहेत.