तलावातील पाणी पातळीत वाढ होईपर्यंत इमारत बांधकामांना महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करावा

भाजपा दक्षिण-मध्यचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांची मागणी

तलावातील पाणी पातळीत वाढ होईपर्यंत इमारत बांधकामांना महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करावा

राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अजून पुरेसा पाऊस धरण क्षेत्रात पडलेला नाही. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. हे संकट अजूनही टळले नसून अजूनही अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची भीषण समस्या नागरिकांना भेडसावत आहे. यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर तोडगा काढणे आवश्यक असून भाजपा दक्षिण-मध्यचे जिल्हाध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे.

भाजपा दक्षिण-मध्यचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रातून महत्त्वाची मागणी केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी पातळीत वाढ होईपर्यंत मुंबईतील इमारत बांधकामांना महानगरपालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईतील रहिवाश्यांना पाणी प्रश्न भेडसावत असून मुंबईत बांधकामासाठी विकासक मोठ्या प्रमाणात पाणी वापरत आहेत. मुंबईतील रहिवश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण असताना मुंबई मध्ये इमारत बांधकामे मात्र जलद गतीने सुरू आहेत. त्यामुळे जो पर्यंत योग्य प्रमाणात पाऊस पडून तलावात पाण्याची पातळी वाढून पाणी साठा होत नाही, तो पर्यंत मुंबईतील इमारत बांधकामांना महानगरपालिकेचा पाणी पुरवठा बंद करण्यात यावा, अशी मागणी राजेश शिरवडकर यांनी पत्रातून केली आहे.

हे ही वाचा:

वर्ल्डकप फायनल मुंबईतून दूर न नेण्याचा सल्ला देणाऱ्या आदित्य ठाकरेंना बीसीसीआयने सुनावले

ब्रिटननंतर इराणमध्येही सत्तांतर; हिझाब विरोधी नेता बनणार राष्ट्रपती

पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!

तलावातील गाळ साफ करण्यात यावा

तसेच राजेश शिरवडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक पत्र लिहून मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील गाळ साफ करण्याची विनंती केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. या साचलेल्या गाळामुळे तलावातील पाणी दूषित होते. त्याच बरोबर तलावातील जलचरांचे जीवन धोक्यात येत आहे. त्यासाठी हे तलाव स्वच्छ करणे आवश्यक आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव स्वच्छ करण्यासाठी तलावातील गाळ काढणे आवश्यक आहे. तलावातील गाळ काढल्याने तलावाची खोली वाढून अतिरिक्त पाणी जमा होईल आणि भविष्यात पाणी संकटातून मुंबईकरांची सुटका होईल, अशी मागणी राजेश शिरवडकर यांनी पत्रातून केली आहे.

Exit mobile version