राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असताना सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांची विशेषतः लिंबू, संत्रा, आंबा, केळी बागांची दैना उडाली आहे. तसेच रब्बी, उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळ आणि गारपिटीने पिके जमीनदोस्त झाली आहे. पावसासह जोरदार वारा वाहिल्याने नुकसान अधिक झाले आहे. कांदा, ज्वारी, भाजीपाला, आंबा, लिंबू, पपई, केळी, गहू, टरबूज-खरबूज अशा विविध पिकांचे हे नुकसान झाले आहे.
यासोबतच पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाने दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात मोठी गारपीट झाल्याने १२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही वादळी पावसाने हजेरी लावत गारपिटीने झोडपून काढले. लातूर जिल्ह्यात द्राक्ष, आंब्यांच्या बागांना फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाने तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. तीन हजार ४११ हेक्टरवर नुकसानीची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हे ही वाचा:
मध्य पूर्वेकडील देशांवर युद्धाचे सावट
सहा विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हरयाणा शाळेला नोटीस
गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!
तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज
पूर्व विदर्भात शुक्रवारी वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीचा (यलो अलर्ट) इशारा हवामान विभागाने दिला आहे.