मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ती बुधवारी खरी ठरली. दक्षिण मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. थंडीचा महिना असताना पावसाचे आगमन झाल्यामुळे जनसामान्यांची त्रेधा उडाली.
हवेची स्थिती काही दिवस वाईट होती आणि पावसाच्या आगमनाचे संकेत दिले जात होते. वेधशाळेने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला.
पावसाची शक्यता असली तरी जनसामान्य पावसाच्या तयारीने घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे कार्यालयातून घरी परतत असताना अचानक पावसाने गाठले. रस्त्याच्या कडेला उभे असलेले फेरीवाले, ठेलेवाले यांची तारांबळ उडाली. फुले, फळे, भाज्या विकणाऱ्यांची धावपळ उडाली. अर्धा नोव्हेंबर सरल्यानंतर पाऊस कोसळत असल्यामुळे थोडी थंडीही वाढली. आता पुढील तीन-चार दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने त्या तयारीने मुंबईकरांना आपापल्या कामाच्या ठिकाणी जावे लागणार आहे. अचानक पाऊस आल्याने मग घरातील छत्र्या, रेनकोट पुन्हा एकदा बाहेर काढावे लागले. लहान मुलांनी मात्र या पावसाचा आनंद लुटला.
हे ही वाचा:
‘एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही एक ऐतिहासिक लढा लढत आहात’
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर फरार
समीर वानखेडे मुस्लिमच; महापालिकेचा दावा
भालचंद्र शिरसाट यांच्या गच्छंतीसाठी पालिकेने केली एक कोटींची उधळपट्टी!
दिवाळी नुकतीच संपलेली असल्यामुळे ठिकठिकाणी असलेले सार्वजनिक कंदिल, सजावट मात्र पावसाने पुरती भिजून गेली. काही ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटनाही घडल्या.