भारत दहशतवादावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) दोन बैठकांचे आयोजन करणार आहे. या दोन्ही बैठका या महिन्याच्या अखेरीस होणार आहेत. विशेष म्हणजे यातील एक बैठक मुंबईतील ताज हॉटेलमध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आपल्या मुख्यालयाबाहेर क्वचितच अशा बैठका घेते. नवी दिल्ली आणि मुंबई येथे दोन बैठका होणार आहेत.
२०१५ नंतर अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे जी न्यूयॉर्कच्या बाहेर होत आहे. यूएनच्या काउंटर टेररिझम कमिटीमध्ये पंधरा स्थायी आणि अस्थायी सदस्य आहेत. तर २०२२ मध्ये भारत या समितीचा अध्यक्ष आहे. दहशतवादाविरोधात भारताचे प्रयत्न पाहता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने ही बैठक भारतात घेण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जातं आहे.
या बैठकीची बहुतांश औपचारिकता नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पार पडणार आहे. या बैठकीत सर्व पंधरा सदस्य देश सहभागी होणार आहेत. २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचे बळी गेले होते. त्यामुळे या बैठकीतून पाकिस्तानला कडक संदेश मिळू शकतो असं सांगितलं जातं आहे.
हे ही वाचा:
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
या बैठकीदरम्यान दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांनाही श्रद्धांजली वाहिली जाऊ शकते. या बैठकीद्वारे युएनएससीचा स्थायी सदस्य असलेल्या चीनलाही कडक संदेश दिला जाऊ शकतो. कारण या हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीरवर भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली होती, तेव्हा चीनने त्याला विरोध केला होता.