केंद्रीय मंत्री कौशल किशोर हे तरुणांना मद्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
तरुण मुले आणि जे मद्याच्या आहारी अजून गेले नाहीत, अशा लोकांना नशेपासून दूर सुरक्षित ठेवण्यासाठी कौशल किशोर प्रयत्न करणार आहेत. कौशल किशोर यांनी त्यांचा मुलगा आकाश किशोरला मागील वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये गमावले. आकाश याला मद्याचे व्यसन लागले होते. त्याला नशामुक्त करण्यासाठी कौशल यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु ते त्यांच्या २८ वर्षीय मुलाला वाचवू शकले नाहीत.
मी स्वतः खासदार होतो आणि माझी पत्नी आमदार होती, तरीही आम्ही आमच्या मुलाला वाचवू शकलो नाही. विष माणसाचा जीव लगेच घेतं आणि मद्य किंवा इतर शरीराला घातक असणारे पदार्थ माणसाचा जीव हळूहळू घेत असतात. अजूनही व्यसनाच्या अधीन झालेले नाहीत अशा लोकांना मद्य आणि इतर आरोग्याला धोकादायक असलेल्या पदार्थांपासून वाचवायला हवे, असे कौशल किशोर यांनी सांगितले. शिक्षकांनी याबद्दल जागृती करावी, असे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले.
हे ही वाचा:
अरेरे! ‘त्या’ अंगरक्षकाने अखेर बोट गमावले
अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार
सिद्धार्थच्या निमित्ताने नवी चिंता; युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण का वाढते आहे?
बजबजपुरी! मुंबईतील खड्डे बुजता बुजेना
मुलाला गमावण्याच्या दुःखातून इतर कोणत्याही कुटुंबाने जाऊ नये, असेही कौशल यांनी सांगितले. मद्य आणि इतर घातक पदार्थांच्या विक्रीवर बंदी का आणली जात नाही, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की या पदार्थांना मागणी नसणे हाच उपाय आहे. याआधीची अशी अनेक उदाहरण आहेत जेव्हा मद्य बंदी केली गेली होती, पण ती यशस्वी झाली नाही. बेकायदेशीरपणे मद्य विक्री होतच राहते. गुजरात आणि बिहारमध्ये मद्य विक्रीला बंदी आहे. पण बेकायदेशीररित्या मद्य तिथे मिळत नाही का, असा सवाल त्यांनी केला. लोकांच्या मनात आणि डोक्यात या सर्व घातक पदार्थांबद्दल भीती निर्माण व्हायला हवी, की याने स्वतःचा जीवही जाऊ शकतो, असे कौशल किशोर म्हणाले.