उगमस्थानापासूनच इंद्रायणी, पवना नदीच्या प्रदूषणाला सुरुवात

नदीच्या उगमस्थानापासून येणारे नाले अडवावेत, अशा खासदारांच्या सूचना

उगमस्थानापासूनच इंद्रायणी, पवना नदीच्या प्रदूषणाला सुरुवात

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी या दोन नद्यांमध्ये अनेक ठिकाणी सांडपाण्याचे नाले सोडले आहेत. यामुळे या नद्या दूषित होतात. त्यासाठी प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडले गेले पाहिजे. नदीच्या उगमस्थानापासून येणारे नाले अडवावेत, त्यामुळेच नद्या अधिक प्रदूषित होत आहेत, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका, पीएमआरडीए प्रशासनाला केल्या आहेत. इंद्रायणी नदीत पांढरा फेस दिसत असल्यामुळे आणि त्यात स्नान केल्यामुळे वारकऱ्यांना रोग होण्याची शक्यता लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे.

नदी स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठान व सिटिझन फोरमचे डॉ. विश्वास येवले, राजीव भावसार, सूर्यकांत मुथीयान, ओंकार गिरिधर, तुषार शिंदे, संदीप माळी, धनंजय भातकांडे, रवी उलंगवार यांच्यासह खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांच्यासोबत बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, पवना, इंद्रायणीमध्ये अनेक ठिकाणी नाले थेटपणे सोडले जातात. या पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. या पाण्यामुळे नदी दूषित होते. नदीच्या उगमस्थानापासूनच नदीत सोडले जाणारे सांडपाणी अडविण्यात यावे. प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडले पाहिजे. त्यासाठी ज्या गावातून नदी वाहते, त्या प्रत्येक गावातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळा यांना सोबत घेऊन नदी स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. नागरिकांना नदी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. महापालिका, पीएमआरडीए हद्दीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करावी. तळेगाव दाभाडे, देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड ज्या क्षेत्रातील पाणी नदीपात्रात जाते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. त्यांनाही त्यांच्या हद्दीतील पाण्यावर प्रक्रिया करण्याची सूचना करणार आहे.

हे ही वाचा:

कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत; क्रीडामंत्र्यांनी दिले आश्वासन

पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांना कागदी घोड्यांचा फटका

मिरा रोड हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी म्हणतो, आत्महत्येनंतर तुकडे केले!

अखेर प्रतीक्षा संपली; देवभूमीत मान्सूनचे आगमन!

एमआयडीसीतील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत बैठक घेणार आहे. एमआयडीसीतील पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे त्यांना सांगितले जाईल. नदी स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला आहे. यापुढे दर महिन्याला बैठक घेऊन नदी सुधारचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष कारवाईचा आढावा घेणार आहेत. देशाला उदाहरण ठरेल अशी पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी झोकून देवून काम करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

Exit mobile version