राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, २८ जून रोजी विधानसभेमध्ये सरकारचा २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा असतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. याअनुषंगाने अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील २१ ते ६० वयोगटामधील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत.
या योजनेची माहिती देताना अजित पवार म्हणाले की, “स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थाजन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढत आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या आणि कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध परीक्षांमधून मुलींची आघाडी दिसून येत आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, लेकी बहिणींसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबविण्यात येत आहे.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासह सर्वांगिण विकास यातून सध्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६० वयोगटामधील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा १५०० रुपये प्रदान केले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘एक अकेला मोदी, सब पे भारी’च्या घोषणा
दरम्यान, सरकारने २०२३- २४ पासून ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षांची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एक लाख रुपये देण्यात येतात. तसेच महिलांच्या स्वयंरोजगारासाठी ‘पिंक ई रिक्षा योजने’ची घोषणा करण्यात आली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १७ शहरांमध्ये १० हजार महिलांना अर्थसहाय्य करण्यात येईल, यासाठी ८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.